बीड : मस्साजोग सरंपच हत्या, दोन कोटी रुपयांची खंडणी या दोन गुन्ह्यांतील आरोपी वाल्मीक कराडसह चार आरोपींचे बँक खाते सीआयडीने फ्रीज केले आहे. त्यांच्या शोधासाठी सीआयडीचे नऊ पथके देशभरात तपास करत आहेत.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येसह दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. कराडला अटक करून मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी शनिवारी मोर्चातून करण्यात आली होती. त्यानंतर सीआयडीने तपासाची गती आणखी वाढविल्याचे दिसत आहे.
सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि वाल्मीक कराड या चार आरोपींचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. सीआयडीच्या नऊ पथकांकडून देशभरात त्यांचा शाेध सुरू आहे. फरार आरोपींच्या पासपोर्टबाबतही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही. सीआयडीचे छ. संभाजीनगरचे पाेलिस अधीक्षक सचिन पाटील हे बीड शहर ठाण्यात ठाण मांडून होते.
आरोपींचे ठसे जुळलेपोलिसांनी घटनेनंतर एक काळ्या रंगाची चारचाकी गाडी जप्त केली होती. त्यावरील ठसे आणि अटकेत असलेल्या आरोपींच्या ठशांची तपासणी केली असता ते जुळले आहेत. हा मोठा पुरावा सीआयडीच्या हाती लागला आहे.
मारहाणीचे चार व्हिडीओही हाती लागलेपोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही व्हिडीओदेखील हाती लागले आहेत. तसेच त्या मोबाइलमधून कोणाला कॉल केले, याचीही माहिती पोलिसांनी घेतली. यात काही राजकीय नेत्यांना कॉल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
संध्या सोनवणे यांची दिवसभर चौकशीराष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांना रविवारी सकाळीच बीड शहर पोलिस ठाण्यात आणले होते. रात्री आठ वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरूच होती. जबाब घेण्यासह इतरही पुरावे त्यांच्याकडून मिळवले जात आहेत. सोनवणे यांचा यात काय रोल आहे, त्यांना चौकशीसाठी का बोलावले? याबाबत चर्चांना उधाण आले होते.