Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता पुन्हा एकदा आंदोलन सुरू होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आता मुंबईत मोर्चा निघणार आहे. यासाठी बीडमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला 'चलो मुंबईची' घोषणा केली. आता मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय परतायचे नाही. गुलाल उधळूनच परत यायचे असा निर्धार यावेळी जरांगे पाटील यांनी केला. पाटील यांनी यावेळी राज्य सरकारवर टीकाही केली.
"आम्ही शांतपणे मुंबईला जाणार आणि शांततेत मराठा आरक्षण घेणार, समाजावर आलेले संकट मोडून काढणार. मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
"बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात , जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचे ते करा असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिले. जर सरकारने आम्हाला आरक्षण दिले. आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ?, असेही जरांगे पाटील म्हणाले.
'संकट आता मोडून काढायचे'
जरांगे पाटील म्हणाले, गडबड घोटाळा करु नका. त्यामुळे मराठा समाजावर संकट घोंघावतेय. ते संकट आता मोडून काढायचे आहे. तुमच्या आणि माझ्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी वापर करुन घेतला. मराठ्यांची ताकद मोठी आहे, पण आपण विचारांनी चाललो नाही. त्यामुळे आपल्या मुलांचे नुकसान झाले. प्रत्येकाने आपला वापर केला. उभ्या पिढ्यांचे वाटोळे झाले. यापुढे आपण विचारांनी चालायचे. जीव गेला तरीही मागे हटणार नाही, ,गुलाल उधळूनच परतायचे, असेही पाटील म्हणाले.