परळी(बीड)- महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खुनाच्या घटनेस 19 महिने झाले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. आरोपींना तात्काळ अटक करावी व या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या माहेर कन्हेरवाडी व सासर भोपळा येथील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी २५ जुलै रोजी परळी-अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी सोमवारी पोलिस प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मनोज जरांगेंनी घेतली मुंडे कुटुंबाची भेटदरम्यान, आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी महादेव मुंडे खून प्रकरणाची सविस्तर माहिती पत्नी ज्ञानेश्वरी व सतीश फड यांनी जरांगे पाटलांना दिली. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना महादेव मुंडे कुटुंबीयांना तात्काळ वेळ द्यावी आणि या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी मान्य केली. तसेच, आरोपींना अटक करावे, अन्यथा केवळ बीड जिल्हाच नव्हे, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, या कुटुंबावर संकट कोसळले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. न्याय कसा मिळत नाही, हेच आता पाहतो. यावेळी “दादा, आता न्याय तुम्हीच द्या,” अशी कळकळीची विनंती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या मीरा महादेव गीते यांनी, “माझे पती महादेव गीते यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. आमच्या कुटुंबालाही न्याय मिळावा,” अशी भावनिक मागणी जरांगे पाटलांकडे केली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील परळीत आल्यामुळे प्रिया नगर भागातील महादेव मुंडे यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.