१४१ रुग्णांवर पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया : अंबाजोगाईत आतापर्यंत आले २७८ रुग्ण
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : कोरोना संसर्गानंतर बुरशीजन्य म्युकरमायकोसिस झाल्याचे कळताच रुग्णाच्या नातेवाइकांना येणाऱ्या खर्चामुळे अक्षरश: धडकी भरते. म्युकरमायकोसिस आजार जडलेल्या रुग्णाचा खर्च पाच लाखांपासून १५ लाखांपर्यंत असू शकतो. कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना रोजगार गमवावा लागला; तर अनेकांना वेतनकपातीला सामोरे जावे लागले. व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. अशा परिस्थितीत उपचाराकरिता पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उभा राहिला असतानाच या रुग्णांसाठी राज्य शासनाची ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ नवसंजीवनी ठरली आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सुमारे १४१ रुग्णांवर या योजनेतून ८१ लाख रुपयांचे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. बीड व इतर जिल्ह्यांतून येथील स्वाराती रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे २७८ रुग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांवर स्वारातीमध्ये शस्त्रक्रिया व इतर उपचार झाले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १४१ रुग्णांच्या नाक-कान-घसा विभाग, नेत्ररोग विभाग, भूलतज्ज्ञ विभाग, दंतरोग विभाग, मेडिसिन विभागाच्या वतीने या सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया व मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे शासनाची ही योजना रुग्णांसाठी जीवनदायिनीच ठरली आहे.
आतापर्यंत २७८ रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले आहेत. ६८ रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांना म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराचा धोका वाढत असल्याने शुभ्र शिधापत्रिकाधारकांनाही आता या योजनेचा लाभ मिळवून दिला जात आहे. रुग्णांवर राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार होत झाल्याने नातेवाइकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
- डॉ. नितीन चाटे
समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना
स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने निर्माण केलेल्या आव्हानांना सामोरे जात असतानाच नव्याने बळावलेल्या म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या गंभीर आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी स्वाराती ग्रामीण रुग्णालयात विशेष वॉर्ड कार्यान्वित केला आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात राहणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर अंबाजोगाईत महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले आहेत.
- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई
म्युकरमायकोसिसचे एकूण रुग्ण - २७८
मोफत उपचाराचा लाभ व शस्त्रक्रिया झालेले एकूण रुग्ण - १४१
योजनेंतर्गत रुग्णांच्या उपचारावर खर्च झालेला निधी - ८१ लाख रुपये
-------
मोफत शस्त्रक्रियेसाठी कागदपत्रे आवश्यक
केवळ रेशनकार्ड (शिधापत्रिका) मग ते कोणतेही असो, अगदी शुभ्र (पांढरी) असली तरी व ओळख पटविण्यासाठी एक ओळखपत्र, ज्यात आधार कार्ड, वाहन परवाना, बँक पासबुक, मतदान कार्ड, संस्थेचे ओळखपत्र, आदींचा समावेश आहे. ही कागदपत्रे संकलित केल्यास म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतात.
------