परळी: येथील बँक कॉलनी परिसरात राहणारे पिग्मी एजंट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याच्या घटनेस 16 महिने होत आले आहेत. तरी अद्याप या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिसांना लागला नाही. तसेच त्यांच्या खुनाचे कारणही अस्पष्टच आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परळी येथे येऊन मुंडे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी यांनी आपबीती कथन करून न्याय मिळत नसल्याची व्यथा खा. सुळे यांच्या समोर मांडली. खा. सुळे यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आ. संदीप क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
माझ्या पतीचा कोणसोबत वाद नव्हता, त्यांची हत्या का झाली? कोणी केली? याची काहीच माहिती पोलिस देत नाहीत. आता १५ महिन्यांच्या नंतरही तपासात काहीच हाती लागले नसल्याची खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर व्यक्त केली. त्यानंतर खा. सुळे यांनी बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांना फोनवरून संपर्क केला. मुंडे यांच्या हत्येच्या तपासातील प्रगती जाणून घेत खा. सुळे यांनी पोलिस अधीक्षक कॉवत यांच्याकडे लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली. तसेच तपासात काय प्रगती झाली याची माहिती मुंडे कुटुंबांना वेळोवेळी देण्यात यावी असेही खा. सुळे म्हणाल्या. त्यावर मी स्वतः मुंडे कुटुंबाला माहिती देईल, असे पोलिस अधीक्षक कॉवत म्हणाले.
काय आहे प्रकरणमहादेव मुंडे यांच्या खून प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध 22 ऑक्टोबर 2023 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा घटना घडल्यानंतर परळी शहर पोलिसांनी तपास केला. परंतु या तपासात पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात यश आले नाही. याप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना घटनेच्या पंधरा महिन्यानंतरही अटक केली नसल्याची पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही बीडचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली . त्यानंतर पुन्हा महादेव मुंडे यांचे खून प्रकरण चर्चेत आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी परळी शहर पोलिसांकडून तपास आता अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्याकडे दिला आहे.
डीवायएसपींच्या विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी सुरूपरळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक साबळे व एलसीबी चे हवालदार आहेत. या पथकामार्फत सध्या आरोपींचा शोध चालू आहे. यासाठी काहींची चौकशीही सुरू असून धागेदोरे सापडावेत म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विशेष पोलीस पथक परळीत ठाण मांडून आहे.