नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
लाेकमत न्यूज नेटवर्क
बीड : बर्ड फ्लूच्या संकटामुळे कोंबडीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून बीड जिल्ह्यातील लहान शेतकरी व तरुण कोंबडी पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. बर्ड फ्लूच्या केवळ अफवेमुळे आज ७० ते ७५ रुपये किलोने तयार होणारी कोंबडी ३० ते ४० रुपये किलोने विकण्याची वेळ कुक्कुटपालकांवर आली आहे. पर्यायाने हा व्यवसाय मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली असून, यापूर्वीही कोरोनाच्या अफवेमुळे १० ते २० रुपये किलो दराने कोंबडी विकली होती. मागील काही दिवसांपासून बाजार सुधारला होता, तर आता बर्ड फ्लूच्या संकटामुळे आम्ही कोंबडी उत्पादक फक्त अफवेचेच बळी ठरत आहोत. सरकारने पशुसंवर्धन विभागामार्फत नुकसानाचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले आहे. यावेळी गणेश राऊत, अजीज कुरेशी, बालू सालगुडे, नीलेश मस्के, हरून पठाण, शेख निसार, सचिन जगताप, गणेश ढोरमारे, विष्णू लहाने, अनिल शिंदे, राज महंमद, शेख नदीम, सतीश सालगुडे, राज बागलाने, शिवाजी साखरे, बाळू जगताप, यांच्यासह भांडारवाडी, नेकनूर, अंधापुरी, पालवन, कलसंबर, मांजरसुंबा येथील शेतकरी उपस्थित होते.