लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या देशी, विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. सततच्या दारूच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी गावातील दारू दुकानातील दारूच्या बाटल्या फोडून दुकान बंद पाडले.
गावात येथून पुढे दारू विक्री केल्यास असाच विरोध करण्यात येईल, असा इशाराही महिलांनी दारू विक्रेत्यांना दिला. गाढे-पिंपळगाव येथे गेल्या काही वर्षांपासून परवानगी नसताना सर्रासपणे देशी, विदेशी दारूची विक्री होत होती. यामुळे गावातील अनेक रहिवाशांचे संसार उघडण्यावर येऊ लागले. याचा त्रास महिलांना होत आहे. या अवैध दारू विक्रेत्यांविरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात अनेकवेळा महिलांनी तक्रार केली. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. दरम्यान, गावातील महिलांनी एकत्रित येऊन मंगळवारी गावातील दारूच्या दुकानातील दारू बाटल्या फोडून दारू नष्ट केली.
...
ठरावाची मागणी
ग्रामपंचायतीच्यावतीने गावात दारूबंदीचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी महिलांच्यावतीने करण्यात आली आहे. महिलांसोबत यावेळी सरपंच वर्षा सोनवणे, सदस्य अर्चना रुपनर, अहिल्या कुकर व गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी जि. प.चे माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर वाघमोडे, चंद्रकांत सोनवणे, रामेश्वर वाघमोडे, जयवंत कराड, शरद राडकर, वसंतराव सोनवणे यांनीही महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
....