- नितीन कांबळेकडा- मंगरूळ परिसरातील मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड आहे. या पिकात तीन दिवसांपासून बिबट्याने मुक्काम ठोकला असून अनेक श्वांनाचा फडशा पाडला आहे. वनविभागाने याची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
आष्टी तालुक्यातील मंगरूळ परिसरात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. ऊसाच्या पिकाचा आधार घेऊन बिबटयाने सुरेश दिंडे यांच्या शेतात मुक्काम ठोकला हे. त्यानंतर तीनच दिवसात बिबट्याने परिसरातील अनेक श्वानांचा फडशा पाडला असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्वानांची शिकार करताना एखाद्याचा बळी जाऊ नये यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय ढगे यांच्या आदेशावरून वनरक्षक बी.ए शिंदे, ए. एस काळे, के. डी पंदलवाड, जे बी आरगडे, वनमजूर शेख युनूस, या कर्मचाऱ्यांनी परिसरात भेट दिली. वनविभागे पथक त्या परिसरात जाऊन आले आहे. ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार असून वनविभाग लक्ष ठेऊन असल्याचे आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय ढगे यांनी सांगितले.