केज (बीड): केज तालुक्यातील कानडीमाळी शिवारात मंगळवारी (दि. 13) सकाळी साडे सहाच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी आलेले अभियंता सचिन केरबा गोरे (वय 25, रा. अवंतीनगर, बार्शी रोड, लातूर) खदानीच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले.
लातूर येथील सिंकसन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीकडून कानडीमाळी येथील एका क्रेशरवर सौर पॅनल बसवण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू होते. हे काम मंगळवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर सचिन गोरे व इतर चार सहकाऱ्यांनी जवळच असलेल्या खदानीत पोहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोहता न येणाऱ्या सचिन गोरे यांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने ते खोल पाण्यात बुडाले.
त्यांचे सहकारी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांना वाचवण्यात अपयश आले. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी भेट देत बीडच्या अग्निशमन दलासह खासगी पाणबुड्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. मात्र, मृतदेह सापडला नाही.
११ तासांच्या शोधानंतर मृतदेह बाहेरशेवटी माजलगाव येथून आलेल्या खासगी पथकाने गळ टाकून मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली आणि तब्बल ११ तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री १०.३० वाजता सचिन गोरे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. बुधवारी सकाळी केज उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दुपारी २ वाजता लातूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अग्निवीर म्हणून झाली होती निवडसचिन गोरे हे विवाहित असून त्यांची नुकतीच अग्निवीर म्हणून निवड झाली होती आणि लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार होते. मात्र, त्याआधीच हा दुर्दैवी अपघात त्यांच्या आयुष्याची अखेर घेऊन आला.एनर्जी कंपनीचे संचालक विश्वजीत माने यांनी सांगितले की, सकाळी काम संपल्यानंतर ते लातूरला परतण्याच्या तयारीत होते, त्याच वेळी ही दुर्घटना घडली.