माजलगाव - महाराष्ट्रातील विदर्भ व मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यातून दलालामार्फत काही स्त्री-पुरुषांना जास्त पैशाचे आमीष दाखवून मोलमजुरी करण्यासाठी माजलगाव तालुक्यात आणण्यात आले होते. मागील अनेक दिवसांपासून या मजुरांचे संबंधित व्यक्तीकडून शोषण करून वेठबिगारीस मजबूर केले जात असल्याची माहिती उघड झाली. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी अनेक मजुरांना ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन दिवसापासून आणले असता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे सांगितले जाऊ लागले.
विदर्भातील अमरावती व भंडारा त्याचबरोबर मध्य प्रदेश मधील छिंदवाडा येथील मजुरी करणाऱ्या कुटुंबास जास्तीची मजुरी देण्याची लालच दाखवून तालुक्यातील शिंदेवाडी , देवखेडा , मालीपारगाव यासह काही गावात गुऱ्हाळात मजुरी करण्याची सांगत आणण्यात आले होते. मात्र या मजुरांना गुऱ्हाळात काम देण्याऐवजी शेतातील कापूस वेचणी चे काम करून घेत त्यांना तुटपुंजी मजुरी देत त्यांच्याकडून वेठबिगारी करण्याचे काम करून घेतले गेले. या मजुरांना एका दलालामार्फत आणण्यात आले होते. संबंधित दलालाने काही मजुरांना दोन महिन्यापूर्वी , काही मजुरांना एक महिन्यापूर्वी व काही मजुरांना पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी आणले होते. यातील काही जण पळून देखील गेल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सत्यभामा सौंदरमल यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी शनिवारी सकाळी या मजुरांची भेट घेतली. व त्यांची सर्व माहिती करून घेतल्यानंतर त्यांनी शनिवारी दुपारी पाच महिला, दहा पुरुष व एक नऊ महिन्याचा बालकास ग्रामीण पोलीस ठाण्यात घेऊन येत येथील पोलीस निरीक्षक बालक कोळी यांना घडलेल्या सर्व प्रकारची माहिती दिली. परंतु बालक कोळी यांनी सदर प्रकाराबाबत गांभीर्याने घेतले नाही व वेठबिगारी चा गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचा आरोप देखील सत्यभामा सौंदरमल यांनी केला आहे.
सदर मजूर दोन दिवसापासून ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून बसलेले आहेत. दोन दिवस उलटले असताना देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ का करत आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे.दोन दिवसापासून आम्ही या सर्व मजुरांना घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर थंडीमध्ये बसलेलो आहोत. याबाबत पोलिसांना मजुरांना घेऊन येणाऱ्या सुनील अलझेंडे नामक व्यक्ती बाबत सर्व माहिती दिली असताना देखील पोलिसांकडून दोन दिवसापासून वेटबिघारीचा गुन्हा दाखल केला नाही . सध्या पोलीस ठाण्यासमोर १५ मजूर आलेले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजूर असल्याचे या मजुरांकडून सांगितले जात आहे. या मजुरांकडे सर्व कागदपत्रे व आधार कार्डचा पुरावा उपलब्ध आहे.- सत्यभामा सौंदरमल , सामाजिक कार्यकर्त्या
सदरील मजूर आमच्याकडे आले असता सदरील मजुरांबाबत आम्ही चौकशी करत असून या मजुरांकडील कागदपत्र व आधार कार्डची पाहणी करून याबाबत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात येईल.- बालक कोळी, पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन