बीड : कोयता गँगने बीडसह परिसरातील जिल्ह्यांमध्ये हैदोस घालून जनसामान्यांमध्ये एक दहशत निर्माण केली आहे. या गँगला पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवसह इतर जिल्ह्यांतील पोलिस शोध घेत असताना यातील दोन साथीदार बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी पिस्टलसह दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली. विकास सुभाष सावंत (रा. सावंतवाडी, ता. केज), सोमनाथ राजाभाऊ चाळक (रा.लहुरी, ता. केज) अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली.
केज तालुक्यातील लाहुरी गावात एका तरुणाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती एलसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी कर्मचाऱ्यांच्या टीमला लाहुरी जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ जाण्याचे सांगितले होते. त्या ठिकाणी असलेल्या एका तरुणाचे वर्णनही दिले होते. कसलाही विलंब न करता एलसीबीची टीम लहुरी येथे गेली. त्याठिकाणी सोमनाथ राजाभाऊ चाळक याला शिताफीने पकडले. त्यांच्याजवळ गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस सापडली.
विश्वासात घेतल्यावर सांगितले कोयता गँगचे नावसोमनाथ राजाभाऊ चाळक याला गावठी पिस्टल कोणाकडून आणले अशी विचारणा केली, यावर त्याने कोयता गँगचा सदस्य विकास सुभाष सावंत (रा. सावंतवाडी ता.केज) याचे नाव सांगितले. टीमने शिताफीने विकास सावंत यालाही अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, पोलिस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, तुषार गायकवाड, बप्पासाहेब घोडके , चालक गणेश मराडे यांनी केली.
पाच ते सहाजणांची गँग : लूटमार, चोरी, दरोड्याची तयारी यासह गंभीर गुन्हे करण्यासाठी कोयता गँग सक्रिय आहे. या गँगने काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यापासून काही सदस्य फरार आहेत. या गँगमधील दोघांना अटक केली आहे.
कोयत्या ऐवजी पिस्टल : लुटमारीची दहशत आणि डॉन बनण्यासाठी कोयता गँगच्या सदस्यांनी कोयत्या कमी करून आता मध्य प्रदेश येथून थेट गावठी पिस्टल आणली जात आहे. तिचा वापर करण्यास सुरुवात केली आहे, असे पोलिस तपासात पुढे येत आहे.
विकासचे १२वीपर्यंत शिक्षण : विकास सावंत याचे १२वीपर्यंत शिक्षण झाले आहे. याच्यावर पुणे जिल्ह्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाणे येथे दरोड्याची तयारी १, मारहाणीचा १, पुणे येथील सिंहगड ठाण्यात चोरीचा १ व अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी १ गुन्हा. बीड जिल्ह्यात कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरीचे ३ व धाराशिव जिल्ह्यात २ असे गुन्हे दाखल आहेत.
सोमनाथ चाळकवर पाच गुन्हे :आरोपी सोमनाथ राजाभाऊ चाळक याचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. यांच्यावर बीड जिल्ह्यात कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरीचे ३ व धाराशिव जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल आहेत.