बीड : प्राण्यांची हत्या करण्यासह एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण करणाऱ्या सतीश उर्फ खाेक्या भोसले याला अटक करून मकोका लावावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी रविवारी शिरूरमध्ये पाेलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी खोक्याला पाठबळ देणारे आ. सुरेश धस यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी केली.
खोक्या भोसले याने एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आ. सुरेश धस यांनी तो आपलाच कार्यकर्ता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला. यात दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बाप-लेकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यात खोक्या भोसलेला अटक करावी, या प्रमुख मागणीसह या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, वनविभागाच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटवावे यासारख्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यात प्रा. लक्ष्मण हाके, माजी आ. भीमराव धोंडे, महेबूब शेख, बाळासाहेब सानप, दशरथ वणवे, नवनाथ ढाकणे, रामराव खेडकर आदींनी आपल्या भावना व्यक्त करत आ. धस यांच्यावर टीका केली. तळपत्या उन्हात जिजामाता चौकातून निघालेला हा माेर्चा पोलिस ठाण्यावर धडकला. खोक्याला अटक करा, सखोल चौकशी करा असे फलक हाती घेत घोषणाबाजीही करण्यात आली.
काय म्हणाले लक्ष्मण हाके...सध्या तालुका ज्या कारणाने चर्चेत आला त्याचा सूत्रधार हा उतरंडीच्या वरचे छोटे बोळके असेल तर त्या उतरंडीच्या तळाचे मोठे गाडगे कोण? छोट्याबरोबर मोठ्या गाडग्यावरदेखील गुन्हा दाखल करावा, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी आ. सुरेश धस यांच्यावर हल्ला चढवला.
पोलिसाबरोबर वनविभागावरही ताशेरेया मोर्चातून खोक्याबरोबर त्याच्या बाॅसलादेखील टार्गेट केले जात होते. वनविभागाच्या झडतीदरम्यान त्याच्या घरात सापडलेले मांस आणि शिकारी साहित्याच्या आधारे वनविभागाने कठोर कारवाई करावी. एरव्ही चार मेंढ्या वनपरिक्षेत्रात गेल्या तर मेंढपाळाला सोलून काढणारे अधिकारी आता गप्प का? असा सवाल उपस्थित करत पोलिस आणि वनविभागावरही आंदोलकांनी ताशेरे ओढले.
दोन दिवसांचा अल्टिमेटमखोक्या भोसले याला दोन दिवसात अटक करा, काय तपास केला याबाबत खुलासा देण्यासाठी पोलिसांना दोन दिवसाचा अवधी आंदोलकांनी दिला आहे.
पीडित बाप-लेकाचाही सहभागखोक्या भोसले याने हरीण पकडण्याच्या कारणावरून दिलीप ढाकणे व महेश ढाकणे यांना सत्तूरसह कुऱ्हाडीने मारहाण केली होती. यात दिलीप यांचे १० दात पडले होते तर महेशचा पाय मोडला आहे. सुरुवातीला भीतीपोटी तक्रार दिली नव्हती. परंतु व्हिडीओ व्हायरल होताच त्यांनी गुन्हा दाखल केला. या मोर्चात हे ढाकणे कुटुंबही सहभागी झाले होते.
शिरूर कडकडीत बंदढाकणे दाम्पत्याला मारहाणाीच्या निषेधार्थ आणि खोक्याला अटक करावी यासारख्या विविध मागण्यांसाठी रविवारी शिरूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.