बीड : राष्ट्रसंत ज्ञानानंद महाराज (वृंदावन निवासी) यांच्या प्रेरणेने जिओ गीता परिवाराच्या वतीने शुक्रवारी गीता जयंती साजरी करण्यात आली. पेठ बीड भागातील संतोषीमाता मंदिराच्या सभागृहात गीता सत्संग मंडळ व महिला मंडळाच्या सहकार्याने आयोजन केले होते.
प्रास्ताविक जियो गीता परिवार, बीडचे अध्यक्ष विष्णुदास बियाणी यांनी केले. यावेळी भगवद्गीतेच्या अध्यायांचे सामूहिक पठन करण्यात आले. यावेळी अतिथी जोशी म्हणाल्या, ज्याने आत्मतत्वाची अनुभूती आपल्या स्वतःच्या अंत:करणात
प्रत्यक्ष घेतली तो गीतेचा अर्थ आपल्या पूर्व संस्कारानुसार लावतो. कर्म, भक्ती, ध्यान आणि ज्ञान या चारही गोष्टी एकच आहेत, हे जो स्पष्टपणे जाणतो, त्यालाच गीता समजलेली असते. समदानी यांनी अष्टादश गीतेमधील अठराव्या अध्यायातील श्लोकाच्या ओळींचे विवेचन केले.
भजन, प्रार्थनेनंतर भगवद्गीतेची आरती करण्यात आली. पसायदानाने सांगता झाली. कार्यक्रमाचे पौरोहित्य पुजारी चिंटू पांडे यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकारी विक्रम सारुक, अरुणकुमार, प्रशांत पवळ, सुरज लाहोटी, डॉ. राजेंद्र सारडा, डॉ. सुदाम मोगले, अनिल वट्टमवार तसेच महिला मंडळाच्या सरोज बियाणी मंजू अग्रवाल, गीता अग्रवाल, सविता पवळ तसेच जिओ गीता परिवारातील सदस्य, महिला, परिसरातील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.