अंबाजोगाई- बीड जिल्ह्यात गुंडगिरीच्या माध्यमातून हल्ले होतच राहणार. आम्ही काय नुसत्या भेटीचं देत फिरायच का? पालकमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्यावर पकड राहिली नाही, त्यामुळेच गुंडगिरी वाढत चालली आहे. ही गुंडगिरी निर्माण झालेले विदारक वातावरण दूर करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहोत, असे वक्तव्य मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
परळी तालुक्यातील लिंबोटा येथील युवक शिवराज दिवटे याला गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली. शिवराज याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी(दि.18) दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी शिवराजची भेट घेतली आणि त्याची आस्थेवाईक पणे चौकशी केली. यानंतर जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, शिवराजच्या अंगावरील मारहाणीचे वळ पाहून अंगावर काटा येतो. सामूहिक कट रचून त्याला जीवे मारण्यासाठीच त्याचे अपहरण केले, मात्र लोक धावून आल्याने त्याचा जीव वाचला. अशा घटना वारंवार घडूनही सरकार काहीच करत नाही. किती दिवस आम्ही तरी शांत रहायचे? ही वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. बीड जिल्यातील सर्व घराणे व सामाजिक क्षेत्रातील लोकांशी चर्चा करुन पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. गुंडांचा माज उतरवणार. यापुढे बोलणार कमी व काम जास्त करणार, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
चौकशीच्या फेऱ्यात येऊ नका...शिवराज याला मोठा मार लागला आहे, तो गंभीर जखमी आहे, तरीही डॉक्टर लोक सांगतात त्याला केवळ मुक्का मार आहे. आरोपीला वाचविण्यासाठी जर कोणावर दबाव येत असेल तर घाबरू नका? तुम्ही विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात अडकाल, असा इशाराही त्यांनी वैद्यकीय प्रशासनाला दिला.