गंगामसला : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाला कंटाळून ४५ वर्षीय नरहरी आत्माराम खेत्री या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १९ मे राेजी माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथे घडली.
१९ मे रोजी सकाळी शेतातून येतो, असे घरातील लोकांना सांगून नरहरी निघून गेला होता. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शाेध घेतला असता, एका शेतात विषारी औषध प्राशन केल्याने बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नरहरी याच्या पश्चात कुटुंबात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, वृद्ध आई, मोठा भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ताच गेल्याने हे शेतकरी कुटुंब अक्षरशः खचले आहे.
मृतक नरहरी यांच्यावर बँकेचे, लोकांचे देणे असल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. मयताचा भाऊ विष्णू आत्माराम खेत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. तपास बीट जमादार बाळू सोनवणे व पोकॉ. गोविंद बाबरे करीत आहेत.