गेवराई येथील गजानन नगर भागात ओमप्रकाश मदनराव बेदरे राहतात. तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील नागझरीजवळ त्यांच्या मालकीचा मातोश्री पेट्रोल पंप आहे. पंपावर डिझेल-पेट्रोल विक्रीतून रविवारी दिवसभराची जमा झालेली रोख रक्कम ३ लाख ७६ हजार ८५० रुपये एका बॅगमध्ये भरून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ओमप्रकाश बेदरे हे त्यांच्या कारने (क्र. एम. एच. २३, ए. डी. ४०११) गेवराईकडे निघाले होते. दरम्यान, पेट्रोल पंपाच्या पुढे नागझरी फाट्याजवळ समोरून पांढऱ्या रंगाची विना नंबरची कार बेदरे यांच्या कारला आडवी आली. या कारमधून उतरलेल्या तिघांपैकी दोघांनी काचा फाेडून बेदरे यांच्या कारमध्ये असलेली पैशाने भरलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेतली व नंतर तिघे कारमधून पळून गेले. या प्रकरणी पेट्रोल पंप मालक ओमप्रकाश बेदरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात तिघांविरूद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारच्या काचा फोडून पंप मालकाचे पावणेचार लाख रुपये लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST