कोळगावच्या सूर्यमंदिर संस्थानच्या मठाधिपतींवर अत्याचाराचा झाला होता गुन्हा दाखल
बीड : बाल लैंगिक अत्याचार तथा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी कोळगाव येथील सूर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी याचा अटकपूर्व जामीनचा अर्ज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे महंताच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनेक दिवसांपासून महंत पोलिसांना गुंगारा देत फरारदेखील आहे.
सूर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल केला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. माझ्या मृत्यूला गावातील काही राजकीय व्यक्ती, पत्रकार, पीडित कुटूंब जबाबदार आहे. अवघ्या पाच मिनिटात मी गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचे त्यात त्यांनी म्हटले होते. तेव्हापासून हनुमान महाराज गिरी हे पसार झाले होते. त्यानंतर सलग तीन दिवस पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत होते. महाराजाच्या नातेवाइकांकडून हनुमान महाराज जिवंत असल्याची पुष्टी पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी शोध मोहीम थांबवली; परंतु पोलिसांना गुंगारा देणारा हनुमान महाराज गिरी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. हनुमान महाराज गिरी याने मागील आठवड्यात बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावर दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी झाली; मात्र न्यायालयाने हनुमान महाराज गिरी याला अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिला, त्यामुळे आता महाराजाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.