शिरूर कासार : सर्वदूर प्रसिध्दीस व हजारो भाविकांचे शक्ती आणि भक्तिपीठ मानले जात असलेल्या श्रीक्षेत्र भगवान गडावर आज गर्दीविरहीत गुरूपुजन सोहळा साजरा झाला. अगदी मोजक्याच शिष्य वृंदांकडून गुरूचरणी फुलांच्या पायघड्या घातल्या गेल्या होत्या .
ज्ञानेश्वरी विद्यापीठाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी, सिध्देश्वर संस्थानचे महंत स्वामी, विवेकानंद शास्त्री, राजा हरिश्चंद्र पिंप्रीचे भगवान शास्त्री यांच्यासह भगवान गडाचा साधक वर्ग यांनी आपले गुरूवर्य डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांना निवास ते मूळ गादीघरापर्यंत फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. ज्ञानेश्वरी विद्यापीठाच्या माध्यमातून शेकडो प्रवचनकार, कीर्तनका, गायक, वादक, शास्त्री तयार झाले असून, ते वेगवेगळ्या संस्थानवरून धर्मकार्य करत आहेत. नामदेव महाराज शास्त्री यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रधान आचार्य नारायण स्वामी हे अध्यापनाचे काम करतात. ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा व गडाचे द्वितीय महंत संत भीमसिंह महाराज यांच्या समाधीचे पूजन केल्यानंतर गुरूपुजेचा हा सोहळा संपन्न झाला .
कोरोनाचा शहरात शिरकाव
शिरूर कासार : तालुक्यात कोरोना रुग्ण कमी-अधिक प्रमाणात निघत असले, तरी शहरात मात्र कधी तरी एखाददुसरा रुग्ण निघायचा, मात्र शुक्रवारी आलेल्या अहवालात कोरोनाचा शिरकाव पुन्हा जोर धरत असल्याचे दिसून येते. शहरात पाच नवीन बाधित रुग्ण निघाले असून तालुक्यातदेखील रुग्णसंख्या गुरुवारपेक्षा अडीच पटीने वाढली असल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. शहरात आस्थापना सुरू ठेवण्याच्या वेळेतदेखील कपात केली आहे. मात्र शिथिलता वेळेत गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याने चिंतेची बाब आहे .
तालुक्यात शाळेचे दरवाजे बंदच
शिरूर कासार : पंधरा तारखेपासून शाळा सुरू होण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने घेतलेल्या आढावानुसार एकवीस शाळा सुरू होण्याचा अंदाज होता; मात्र प्रत्यक्षात ही जोखीम कुणी स्वीकारायची म्हणून सरपंचांकडून संमतीपत्रच दिले गेले नाही, तसेच शासन निर्देशानुसार किमान एक महिना त्या गावात एकही रुग्ण नसावा, अशी अटही होतीच. या दोन्हींमुळे तालुक्यात शाळा सुरूच झाल्या नसून, शाळेचे दरवाजे बंदच दिसत आहेत. एकमेव ब्र. वेळंब येथील शाळा सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी विद्यार्थी व पालक फारसे उत्सुक दिसत नसल्याने संख्या फारशी नसल्याचेही सांगण्यात येते. तालुक्यात कोरोना अजूनही थांबलेला नसल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत शेजारच्या गावातूनदेखील विद्यार्थी शाळेत येणे ही धोकादायक असल्याने शाळा सुरू करण्यात मोठा व्यत्यय येत असल्याचे गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी सांगितले .
शेतकरी पावसामुळे अडचणीत
शिरूर कासार : शेतात दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती वाटत असताना पावसाचे आगमन झाले आणि शेतकरी सुखावला होता; मात्र आता मेहनत करून जोमात पिके असताना सतत पडत असलेल्या पावसामुळे पिकांना बाधा पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस असूनदेखील शेतकरी अडचणीत आला आहे.
वृक्षारोपणाला अधिक पसंती
शिरूर कासार : झाडाचे महत्त्व आता सर्वांनाच उमगले असून, सध्या वृक्षारोपणाकडे अधिक पसंती दाखवली जात आहे. फळझाड, फूलझाडाव्यतिरिक्त अन्य झाडांचीदेखील लागवड केली जात आहे. लावलेल्यापैकी पन्नास टक्के रोपांचे संवर्धन चांगले झाले, तर तालुका हिरवागार झाल्याशिवाय राहणार नाही.
230721\img-20210723-wa0057.jpg
फोटो