बीड : जिल्ह्यात वाहनचोरीचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. एकाच दिवशी चार वाहने चारीला गेल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरीची पहिली घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, अण्णासाहेब दशरथ खोसे यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २३ एए ०७७९) ही एका हॉटेलसमोर उभा केली होती. तिचा हॅन्डल लॉक तोडून अज्ञात चोरट्याने ती लंपास केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी चोरीची दुसरी घटना धारूर घाट येथे घडली. ३१ जानेवारी रोजी माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील शंकर अच्युत राठोड यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच ४४ पी ०२९१) ही धारूर घाट येथे उभी केली होती. ती चोरून नेली. घटना उघडकीस आल्यानंतर राठोड यांनी शोध घेतला. परंतु मिळून न आल्यामुळे त्यांनी धारूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दोन चारचाकीदेखील चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या असून, पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे विजय कुमार सुखवीर सिंग (रा. अहमदपूर) यांनी त्यांच्या घरासमोर चारचाकी (क्र. एमएच ०४ सीक्यू ९०२८) उभी केली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना १ जानेवारी रोजी पाहटेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर ते अंबाजोगाई मार्गावर आनंत गोविंदराव लवटे यांनी त्यांची गाडी (एमएच २६ एडी ९९७७) हेडलाईट अचानक बंद पडल्यामुळे उभी केली होती. ती अज्ञात चोरट्याने सुरु करून चोरून नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर लवटे यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारही घटनांमध्ये आरोपी अज्ञात आहेत. दरम्यान, बीड पोलिसांना आव्हान देत वाहन चोरांनी जिल्ह्यात उच्छाद मांडला असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.