बीड : मला कारमधून नेत खोलीत डांबले. नंतर साखळीने हातपाय बांधून कुलूप लावले. तिघेजण बाहेर जाताच आपण सुटका केल्याची फिर्याद केज तालुक्यातील माजी उपसरपंचाने दिली आहे. तर माजी सरपंचाने आपण डांबून ठेवले नसून याच उपसरपंचाने आपल्याला मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. हे दोन्ही परस्परविरोधी गुन्हे पाटोदा पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. परंतु याचा प्राथमिक तपास करून पायाला लावलेल्या कुलपाची 'किल्ली' पोलिसांच्या हाती लागली आहे. दोन्ही तक्रारीत सगळं काही बनावट असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्याचा अहवाल न्यायालयाला पाठविला जाणार आहे.
केज तालुक्यातील माजी उपसरपंच ज्ञानेश्वर इंगळे व कारेगावचे माजी सरपंच दत्तू तांदळे अशी परस्परविरोधी तक्रारदारांची नावे आहेत. मुंबईला जायचे आहे, असे सांगून पाटोदा तालुक्यात नेले. तेथे तांदळेसह तिघांनी एका खोलीत डांबले. पायाला साखळीने बांधून कुलूप लावले तर हात दोरीने बांधले. तसेच खिशातील दोन लाख रुपये व फोन पे वरून ५० हजार रुपये घेतले. हे लोक नाश्ता आणण्यासाठी बाहेर गेल्यावर आपण सुटका केली, अशी फिर्याद इंगळे यांनी दिली आहे. उसने घेतलेले अडीच लाख रुपये देतो असे म्हणून पाटोद्याला नेेले. तेथे गेल्यावर फोन पे वरून ५० हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांनी मारहाण केल्याची फिर्याद तांदळे यांनी दिली आहे. परंतु पोलिसांच्या प्राथमिक तपासात अनेक प्रकार हे खोटे असल्याचे समोर येत आहे.
इंगळे, तांदळे यांचा मसाल्याचा व्यवसायइंगळे व तांदळे हे दोघेही एकाच तालुक्यातील आहेत. दोघे मिळून मसाल्याचा व्यवसाय करतात. त्यातील पैशांवरूनच या दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पांढरे कपडे घालून समोरून गेलेइंगळे ज्या ठिकाणाहून बाहेर पडले, त्याच ठिकाणी एका व्यक्तीने त्यांना पाहिले. पांढरे कपडे घालून समोरून गेले. त्यावेळी त्यांच्या पायात काहीही नव्हते. शेतातून जात होते, असा जबाब एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिला आहे.
आता कुलूप आले कोठून?इंगळे यांना पाहणाऱ्याने त्यांच्या पायात कुलूप नव्हते असे सांगितल्याने नवा ट्विस्ट या प्रकरणाला आला आहे. जर इंगळे पाटोदा ते तांबा राजुरी या दरम्यान चालत गेले, याच दरम्यान पायात कुलूप कोठून आले? असा सवाल आहे. पोलिसांकडून या प्रकरणात संशय व्यक्त करत तपास केला जात आहे. यात आणखी काही लोक सहभागी आहेत का? याचाही तपास करत आहेत.
काही बाबी संशयास्पदया प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. आमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यात ग्रील असलेल्या खिडकी आहेत. तेथून बाहेर पडता येत नाही. तसेच प्रत्यक्षदर्शींनीही इंगळे यांना पाहिले. कार चालकाचाही जबाब घेतला. जबाब, पाहणी आणि इतर मुद्यांवरून हे सर्व संशयास्पद आहे. आता यात बी समरी करून न्यायालयात पाठविले जाणार आहे. त्यांच्या आदेशानुसार खोटी फिर्याद दिली म्हणून गुन्हा दाखलची प्रक्रिया केली जाईल.- सचिन पांडकर, अपर पोलिस अधीक्षक, बीड