बीड : सुनेच्या सतत होणाऱ्या जाचास कंटाळून सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून, या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्करराव अंबादास वडमारे (वय ६१, वर्ष रा. कागदी वेस बीड ) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी सुनेच्या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून इमामपूर रोडवरील खडी मशीन परिसरात एका हिवराच्या झाडाला २४ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी ‘मी सुनेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे’, अशी चिठ्ठी मयताने लिहून ठेवली होती. याप्रकरणी भास्करराव वडमारे यांचा मुलगा अमोल वडमारे याच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ज्योती अमोल वडमारे, श्रीमंत सरपाते, चंद्रकला सरपाते (सर्व रा. मादळमोही ता.गेवराई जि.बीड ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोउपनि पवन राजपूत करत आहेत.