अंबाजोगाई : रेणापूर ते लोखंडी सावरगाव दरम्यानच्या महामार्गासाठी संपादित जमिनीचा मावेजा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नसताना टोल वसुली मात्र सुरु करण्यात आली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सेलू अंबा येथील टोलनाक्यावर धरणे आंदोलन केले. आधी मावेजा द्या, नंतरच टोल वसुली करा अशी मागणी यावेळी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी केली.
मावेजाची जवळपास ४५ कोटींची रक्कम प्रलंबित असताना आणि उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असतानाही टोल वसुली मात्र घाईने सुरु करण्यात आली. त्यामुळे सोमवारी सकाळी शेतकऱ्यांनी ॲड. माधव जाधव यांच्या समवेत टोलनाक्यावर धरणे आंदोलन केले. यावेळी माकपचे कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.या आंदोलनात जगन्नाथ बरुरे, प्रवीण वाघमारे, ईश्वर शिंदे, महेश किर्दंत, रमेश कुडके, बंकट लोमटे, इंद्रजीत जाधव, उमेश देशमुख, प्रदीप लोमटे, धनराज कोळगीरे, सिराजखान पठाण, बालाजी लाड, दत्तात्रय गंगणे, शैलजा औताडे, अ.भा.किसान काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, सतीश भगत, महादेव वाघमारे, सुमतीबाई औताडे, संभाजी वाळवटे , निलेश देशमुख, सतीश भांडे आदींनी सहभाग घेतला.
तहसीलदारांना निवेदन
मावेजाच्या मागणीसह रस्ता आणि पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसूल करू नये, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल माफी द्यावी, सायगाव, सेलू अंबा येथे सर्व्हिस रोड द्यावा या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गणेश सरोदे यांना देण्यात आले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजाभाऊ औताडे यांनी टोल नाक्याच्या पाच किमी परिघातील सर्व वाहनांना टोल माफी देण्याची मागणी केली.
कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
रेणापूर ते लोखंडी सावरगाव या ५४८-ब क्रमांकाच्या महामार्गासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. परंतु, वाघाळा येथील ३५, सेलू आंबाच्या ११ आणि अंबाजोगाई ग्रामीणमधील १३ अशा एकूण ६९ शेतकऱ्यांना तीन वर्षे उलटूनही अद्याप मावेजा मिळालेला नाही. अंबा साखर कारखान्यालाही मावेजा दिला. मात्र गरजवंत शेतकऱ्यांचा मावेजा देताना कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरु आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या
आधी शेतकऱ्यांना मावेजाची रक्कम द्या, रस्त्याचे आणि पुलाचे काम पूर्ण करा आणि नंतरच टोल वसुली करा. गुत्तेदाराचे हित जोपासण्याआधी मावेजापासून वंचित शेतकऱ्यांच्या अडचणीही प्रशासनाने समजून घ्याव्यात.
- ॲड. माधव जाधव, मराठवाडा अध्यक्ष, अखिल भारतीय किसान काँग्रेस