उपाययोजनांकडे दुर्लक्ष
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
अंबाजोगाई : खरीप हंगामासाठी उगवण क्षमतेसाठी विश्वसनीय असलेल्या नामांकित कंपनीच्या बियाणांचा अंबाजोगाई तालुक्यात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मोंढ्यात कृषी सेवा केंद्रांवर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची अक्षरश: झुंबड उडाली होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसले.
अंबाजोगाई तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी बी-बियाणांची आगाऊ खरेदी करून ठेवत आहेत. शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू आहे. तालुक्यात सर्वाधिक खरिपाचे क्षेत्र आहे. या खरिपाच्या उत्पन्नावरच शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून आहे. या पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी सर्वतोपरीने प्रयत्न करतात. मात्र, सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांना नामांकित कंपन्यांच्या बियाणांची टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बाहेरच्या जिल्ह्यातून बियाणे आणू लागले आहेत. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करूनही बियाणे उगवले नव्हते. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. भरपाई मिळावी म्हणून पंचनामे करून प्रस्ताव कृषी कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. परंतु, त्याचाही फारसा फायदा झाला नाही.
बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. दरम्यान, अशा स्वरूपाचा धोका यंदा होऊ नये, म्हणून शेतकरी नामांकित कंपन्यांच्या बियाण्याला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे एखाद्या कृषी केंद्रावर असे बियाणे उपलब्ध असल्यास शेतकरी गर्दी करीत आहेत. अशावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही.