अमर हजारे
दौला वडगाव : राज्यात दूध दराची मोठी घसरण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यातच पेरणीचे दिवस तोंडावर आहेत आणि मशागतीचे भाव आकाशाला भिडले आहेत. कवडीमोल किमतीत पशुधन विकत शेतकरी बी-बियाणे खरेदी करताना दिसत आहे.
महाराष्ट्रात टाळेबंदीच्या पूर्वी दुधाचे भाव समाधानकारक होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पशुधन वाढविण्याचा निर्णय घेतला आणि दुग्ध व्यवसायाचा मार्ग निवडला. यामुळे अनेक शेतकरी पुन्हा दुधाचा धंदा करू लागले. परंतु, अचानक महाराष्ट्रात पुन्हा टाळेबंदी लागू झाली आणि दुधाचे भाव गडगडले. यातच पशुखाद्य यांचे भाव मात्र तेजीत आहेत. दुधाच्या पैशातून पेंड आणि भुसा घेणेसुद्धा अवघड झाले आहे. दुधाच्या पगारातून पशुखाद्याची बरोबरीसुद्धा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे
यातच पशुसंवर्धन करण्यासाठी लागणारा चारा हा चढ्या भावाने मिळतो आहे. उसाचा भाव प्रतिटन तीन हजार रुपये असल्याने एका मोळीला साधारण ६३ रुपये इतका खर्च येतो आहे. एका जनावरासाठी दोन मोळी हा हिशेब ठेवला तरी १२६ रुपये इतका खर्च होतो आणि खुराक आला साधारण पन्नास रुपये आणि तीच गाय दहा लिटर दूध देत असेल तर पंधरा, सोळा रुपये प्रतिलिटरने १६० रुपये होतात. अशी बिकट परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची आहे.
जून महिना सुरू असल्याने आणि पाऊसही चांगला झाल्याने शेतकरी आता पेरणीच्या मार्गावर आहे. परंतु, सोयाबीनचा एका पिशवीचा भाव ३१२५ रुपये असून, कांदा बी सुद्धा चांगलेच तेजीत आहे. जी परिस्थिती बियाण्यांच्या बाबतीत आहे, तीच शेती मशागतीची सुद्धा आहे. ट्रॅक्टरच्या पेरणीच्या भावात मोठा बदल झाला आहे. एक हजार रुपये असणारी पेरणी आता पंधराशेपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ट्रॅक्टर नांगरट दोन हजारांपर्यंत, तर काकऱ्या पाळी १२०० रुपये इतक्या भावाने सुरू झाली आहे. डिझेल दरवाढीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. एकूणच काय तर बियाणे आणि ट्रॅक्टर मशागत वाढली असताना दुधाचा पडलेला भाव आणि गोधनाची मातीमोल किंमत ही शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतालचा फास झाला आहे . गोधन विकून पेरणी करावी की बायकोच्या मंगळसूत्रावर पेरणीसाठी हात घालावा या द्विधा मन:स्थितीत शेतकरी अडकला आहे
दुधाचे भाव पडल्याने आता मोठी पंचायत झाली आहे. घरात गोडेतेल घ्यावे की नाही हीच समस्या झाली आहे. यातच पुढे पेरणी उभी आहे. अशीच परिस्थिती चालू राहिल्यास व्याजाने पैसे घेऊन पेरणी करावी लागेल.
संदीप रामगुडे (शेतकरी)
दुधाचे भाव पडल्याने शेतीचा जोडधंदा तोट्यात आला आहे. यातच कांदा जाग्यावर सडला. त्यामुळे दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे , दिवसभर बाई शेतात काम करते तेव्हा एक तेलाची पिशवी येते, तर ट्रॅक्टरसाठी महिनाभर मजुरी करावी लागेल.
त्रिंबक जाधव (शेतकरी)