अंबाजोगाई :
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीकडून शनिवारी काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या जुलमी राजवटीच्या पाशातून भारत देशाला बाहेर काढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात व जनहितासाठी आंदोलन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप सरकारने पारित केलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्यांचा, वाढती महागाई, बेरोजगारीचा आंदोलनातून निषेध करून ‘राहुलजी को लाना है, देश को बचाना है’, ‘राहुलजी को लाना है, किसान को बचाना है’ असे फलक झळकावून नारा दिला. तसेच महिला काँग्रेसनेदेखील या आंदोलनात सहभागी होत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे डिझेल, पेट्रोल, घरगुती वापराचा गॅस यांची दरवाढ व सर्व प्रकारच्या महागाईविरोधात गॅस सिलिंडरला पुष्पहार घालून आंदोलन केले. ‘राहुलजी को लाना है, महंगाई घटाना है’ असे फलक झळकावून हा नारा देत संकल्प केला. तर, या आंदोलनात युवक काँग्रेस व एनएसयूआयने शहरातील कॉलेजसमोर फलक झळकावून ‘राहुलजी को लाना है, बेरोजगारी हटाना है, युवाओं को रोजगार देना है’ असा नारा दिला.
या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड. विष्णुपंत सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे, शहराध्यक्ष महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, अमोल लोमटे, वाजेद खतीब, सुनील व्यवहारे, धम्मपाल सरवदे, राणा चव्हाण, कचरूलाल सारडा, माणिक वडवणकर, सुनील वाघाळकर, गणेश मसने, सज्जन गाठाळ, भारत जोगदंड, महेबूब गवळीसह जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी, आष्टी, अंबाजोगाई, परळी, धारूर तालुक्यात जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक सेल, ओ. बी. सी. सेल, एनएसयूआय, सोशल मीडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका सहभागी झाले होते.
===Photopath===
190621\avinash mudegaonkar_img-20210619-wa0055_14.jpg