- नितीन कांबळेकडा (बीड): कुटुंब शेतात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करत ४ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी सुलेमान देवळा येथे घडली. भरदिवसा घरफोडी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील काळेवस्तीवर दत्तात्रय कारभारी देसाई राहतात. २६ डिसेंबर रोजी ते घराला कुलूप लावून कुटुंबासह शेतकामासाठी शेतात गेले. बंद घर दिसताच चोरट्यांनी संधी साधत भरदिवसा कुलूप तोडून घरात प्रवेश करत किंमती ऐवज लंपास केला. देसाई कुटुंब शेतातून घरी आल्यानंतर त्यांना घराचे दार उघडे दिसले. पाहिणी केली असता घरात साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच कपाटातील साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण ४ लाख २९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात दत्तात्रय कारभारी देसाई याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी आष्टीचे प्रभारी उपअधीक्षक गोल्डे, अंभोरा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, यांनी भेट दिली.बीड येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञाचे देखील पथक दाखल झाले होते.पुढील तपास सुरू आहे.