बीड : ‘खेड्याकडे चला’, हा महात्मा गांधीजींचा संदेश आज बीड जिल्ह्यात एका वेगळ्याच कारणासाठी अंमलात येताना दिसत आहे. दर्जेदार शिक्षणासाठी मुले पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांकडे धाव घेतात, महागडे क्लास लावतात. मात्र, बारावीच्या परीक्षेसाठी त्यांचा 'प्रवेश' मात्र बीडच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये असल्याचे समोर आले आहे. केवळ बीडमध्ये 'कॉपी' चालते, हा समज त्यांच्या मनात आहे. चौसाळ्यातील प्रकाराने याला दुजोराही मिळाला आहे. बीडची ही ओळख पुसून बीड जिल्हा कॉपीमुक्त करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्यात १०३ केंद्रांवर ४५,२४७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. प्रशासनाने 'कॉपीमुक्त' परीक्षेचे कितीही ढोल वाजवले तरी पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला या दाव्याची हवा निघाली. विशेषतः शहरात शिकणारे पण ग्रामीण केंद्रावर प्रवेश घेतलेले विद्यार्थी आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. अभ्यासासाठी पुणे - मुंबई गाठायची आणि परीक्षेसाठी बीडच्या खेड्यातल्या केंद्रावर 'सेटिंग' करायची, हा नवा पॅटर्न जिल्ह्यात फोफावला आहे.
ड्रोनने उघड केला 'महापूर'; १७ शिक्षकांवर गुन्हाचौसाळा येथील परीक्षा केंद्रावर (केंद्र क्र. २२४) १० फेब्रुवारी जो प्रकार घडला, त्याने सर्वांचेच डोळे पांढरे झाले आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या ड्रोन चित्रीकरणात १६ परीक्षा दालनांमध्ये पर्यवेक्षकांच्या डोळ्यांदेखत कॉपी होताना स्पष्ट दिसले. ज्यांच्यावर परीक्षा पारदर्शक करण्याची जबाबदारी होती, तेच १७ शिक्षक चक्क विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यास मदत करत होते. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
बाहेरचे विद्यार्थी अन 'सेटिंग'चे केंद्रबाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा बीडच्या ग्रामीण महाविद्यालयांमधील वाढता प्रवेश हा केवळ योगायोग नाही. ग्रामीण भागातील काही शिक्षण संस्थांनी 'कॉपीची गॅरंटी' देऊन परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे रॅकेटच चालवल्याचा संशय आता बळावला आहे. महागड्या क्लासेसमध्ये ज्ञान घ्यायचे आणि निकालासाठी बीडच्या 'कॉपी केंद्रांचा' आधार घ्यायचा, या प्रकारामुळे स्थानिक गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
बीड जिल्हा कलावंत अन् गुणवंतांचा, पण...बीड जिल्हा हा मुळात कलावंत आणि गुणवंतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, अलीकडच्या काळात जिल्ह्यातील काही मोजक्या संस्थाचालकांनी शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडला आहे. परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी दुप्पट - तिप्पट शुल्क उकळले जात असून, त्या बदल्यात त्यांना 'पास' होण्याची १०० टक्के खात्री दिली जात आहे.
बोगस प्रवेशांची तपासणी का केली जात नाही?पूर्वी 'शिक्षणमहर्षी' असायचे, पण आता ते 'शिक्षणसम्राट' झाले आहेत. काही खासगी संस्थाचालकांनी जास्तीचे शुल्क घेऊन शिक्षणाचा बाजार मांडला आहे. मुळात, केवळ परीक्षा काळात सीसीटीव्ही बसवणारे प्रशासन आणि शिक्षण विभाग वर्षभर काय झोपा काढतात का? बोगस प्रवेशांची वेळेवर तपासणी का केली जात नाही? हा माझा थेट सवाल आहे.- डॉ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ते, बीड
Web Summary : Students from Pune and Mumbai are enrolling in Beed colleges to cheat on exams. Mass cheating was exposed at a center where teachers were caught helping students. Concerns rise about fairness for local students.
Web Summary : पुणे और मुंबई के छात्र परीक्षा में नक़ल करने के लिए बीड़ के कॉलेजों में दाखिला ले रहे हैं। एक केंद्र पर सामूहिक नक़ल का भंडाफोड़ हुआ जहाँ शिक्षक छात्रों की मदद करते पकड़े गए। स्थानीय छात्रों के लिए निष्पक्षता को लेकर चिंताएँ बढ़ रही हैं।