वडवणी : तालुक्यातील चिंचाळा, परडी माटेगाव, धानोरा, देवडी, काडीवडगाव, साळींबा, चिंचोटी, चिंचवण, चिखलबीड आदी गावांमध्ये आजही सर्रासपणे बंदी असतानाही गुटख्याची विक्री केलेली आढळून येत आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवून तत्काळ कारवाई करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे.
कार्यालयात अस्वच्छता
बीड : येथील विविध शासकीय कार्यालय परिसरात अस्वच्छता दिसून येत आहे. पालिकेच्या मदतीने या ठिकाणी मोहीम राबवण्याची गरज आहे. अस्वच्छतेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सर्व स्वच्छता करून घेण्याची मागणी होत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक
केज : शहरातील बसस्थानक, कळंब रोड, बीड रोड, धारूर रोड या मार्गावरून खासगी वाहनधारक वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून अवैध वाहतूक करीत आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. पोलीस व आरटीओ विभागाने संयुक्त मोहीम राबवत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मद्यपींचा वावर
शिरूर कासार : तालुक्यातील रायमोहा परिसरात सध्या अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे मद्यपींचा वावर वाढला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी हे मद्यपी पडलेले दिसतात. दारू विक्री बंद करण्याची मागणी महिला आणि ग्रामस्थांमधून केली जात आहे.
वाळू उपसा वाढला, गाव रस्ते झाले खराब
गेवराई : तालुक्यातील तलवाडा आणि इतर परिसरातून अवैध वाळू वाहतुकीसह उपसा वाढला आहे. महसूल प्रशासन व पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या वाहतुकीमुळे अनेक गावांमधील रस्ते खराब झाले आहेत.
सर्वत्र खड्डेच खड्डे
बीड : शहरातील नगर रोडहून धानोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यात पाणी साचत असून, मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. नगरपालिका आणि बांधकाम विभागाने याबाबत योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
उन्हाळ्याची चाहूल, रसवंती फिरू लागली
किट्टी आडगाव : वातावरणातील गारवा कमी होऊन, हळूहळू का होईना उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव परिसरामध्ये फिरती रसवंती बच्चे कंपनीसह मोठ्यांना आकर्षित करीत आहेत. यातून विक्रेत्याला रोजगारही मिळत आहे. यावर्षी परिसरात उसाचे पीकही चांगले आले आहे. कारखान्याला न जाणारा ऊस रसवंती, गुऱ्हाळासाठी शेतकरी देत आहेत.