आष्टी : तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करुन सातबारा द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, भूमिहीन प्रवर्गातील अतिक्रमणधारकांनी सोमवारी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीपासून काढलेला मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. आष्टी तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमणधारकांचे अनेक वर्षांपूर्वीचे अतिक्रमण असून, ते शेती करत असताना त्यांच्या नावावर शेती करण्यात आलेली नाही. दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, भूमिहीन, प्रवर्गामधील असून, या कुशीत असेले गायरान धारक हे गायरान क्षेत्रावरील उत्पनातून त्यांचा उदरनिर्वाह भागवत आहेत. वारंवार आंदोलने करूनही शासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या मोर्चात धर्मानंद कांडेकर, जिल्हाउपाध्यक्ष शेख कांतीलाल जोगदध, ग्यानबा साळवे, सुदाम थोरात, संजय पवार, शहाजी सावंत, आनंद साळवे, महादेव शिंदे, महादेव काळे, विजय साखरे, संजय पवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने शेतकर्यांनी तहसीलदार राजाभाऊ कदम यांना निवेदन देण्यात आले. आठ दिवसांत अतिक्रमणे निकाली न काढल्यास तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या वाहनाखाली झोपून आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी आंदोलनावेळी दिला.
या मागण्यांसाठी मोर्चा
जमिनीवरील पीकपेरा नोंदी तात्काळ गांव नंबर-१ला घेऊन गायरानधारकांचे अतिक्रमण नियमित करुन सातबारा उतारा द्यावा, शासकीय गायरान जमिनीवरील शेतीसाठी केलेल्या अतिक्रमित क्षेत्रावर शेततलाव, फळबाग, पिकविमा मंजूर करावे तसेच रमाई, प्रधानमंत्री, ठक्कर बप्पा, शबरी, या योजनेतून घरकुल विनाअट मंजूर करावे. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतून मिळणारे मानधन वाढवून दोन हजार करावे, अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले, वसंतराव नाईक विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे तत्काळ मंजूर करावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
===Photopath===
220621\22bed_7_22062021_14.jpg