बीड : सामान्य रुग्णांच्या तक्रारी वाढत असतानाही आणि समज देऊनही वारंवार गैरहजर राहत असल्याने अंमळनेर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. यावर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हाॅट्सॲपवरून वरिष्ठांकडे राजीनामा पाठविला. तसेच हाच राजीनामा सोशल मीडियावर टाकून जातीय वळण देत अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. अनेक ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकच डॉक्टर कार्यरत आहे. अंमळनेर आरोग्य केंद्रातही डॉ. परमेश्वर बडे हे एकच वैद्यकीय अधिकारी असून एक आरबीएसकेमधील बीएएमएस डॉक्टर त्यांच्या सोबतीला दिले आहेत. असे असतानाही या आरोग्य केंद्रात कायम सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. डॉक्टर गैरहजर असणे, वेळेवर सुविधा न मिळणे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. १ मार्च रोजी जंतनाशक मोहीम असल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल.आर. तांदळे यांनी भेट दिली. यावेळी डॉ. बडे गैरहजर होते. तसेच २ मार्च रोजी ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्येही डॉ. बडे गैरहजर होते. उपस्थित बीएएमएस डॉक्टरने छातीत दुखणाऱ्या रुग्णाला बीडला जाण्याचा सल्ला देत उपचारास टाळाटाळ केली. तसेच फार्मासिस्टही गैरहजर होता. करोडोंची इमारत केवळ वास्तू बनून उभी आहे. या सर्व प्रकाराबात डॉ. बडे यांना नोटीस बजावली होती. यावर डॉ. बडे यांनी थेट व्हॉट्सॲपवर राजीनामा पाठविला. आरोग्य विभागाकडूनही हा राजीनामा स्वीकारून वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे.
जातीय तेढ; एसआयडी मागावर
डॉ. बडे हे राजपत्रित अधिकारी आहेत; परंतु त्यांनी केवळ चार ओळींचा राजीनामा पाठवून हात वर केले. वास्तविक पाहता विहित नमुन्यात हा राजीनामा देणे अपेक्षित असते. तसेच हा राजीनामा सोशल मीडियावर टाकून यात जातीचा उल्लेख करीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता याप्रकरणात एसआयडी आणि सायबर सेलकडून तपास केला जात आहे. त्यामुळे डॉ. बडे आणखीनच अडचणीत आले आहेत.
सरकारी रुग्णालय वाऱ्यावर सोडून खाजगी सराव
सरकारी रुग्णालयात कार्यरत अनेक डॉक्टरांचे खाजगी दवाखाने आहेत. सरकारी रुग्णालये वाऱ्यावर सोडून ते खाजगी सराव जोरात करतात. डॉ. बडे यांचेही खाजगी रुग्णालय आहे. यापूर्वीच त्यांना याबाबत नोटीस बजावली होती.
गैरहजेरीबद्दल नोटीस बजावली होती. खुलासा देण्याऐवजी व्हॉट्सॲपवर राजीनामा पाठविला. तो स्वीकारून वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. योग्य ती कारवाई केली जाईल.
-डॉ. एल.आर. तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, बीड