बीड : नेहमी चर्चेत राहिलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी २० मार्च रोजी मतदान होणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. विद्यमान संचालक मंडळाची मुदत याआधीच संपलेली होती. मात्र कोरोना आपत्तीमुळे शासन निर्देशानुसार निवडणूक लांबली होती. तसेच सध्याच्या मतदार यादीवरील आक्षेपाचे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे बँकेची निवडणूक लांबली होती. दरम्यान, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार १२ फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
१५ ते २२ फेब्रुवारीदरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी छाननी होईल. विधिग्राह्य नामनिर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध होईल. २४ फेब्रुवारी ते १० मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत. १२ मार्च रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप व यादी प्रसिद्ध होईल. २० मार्च रोजी मतदान, २१ मार्च रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
१९ संचालक
बीड जिल्हा बँकेत १३७५ मतदार असून, १९ संचालकांची ते निवड करणार आहेत. यात ११ संचालक सेवा सोसायटीचे असतील (प्रत्येक तालुक्यातून एक), २ संचालक महिला प्रवर्गातून तर अनु. जाती, व्हीजेएटी, ओबीसी, इतर सहकारी संस्था, औद्योगिक / प्रक्रिया सहकारी संस्था, नागरी सहकारी बँक, पतसंस्थेतून प्रत्येकी एक संचालक निवडला जाणार आहे.
जिल्हा बँक सद्य:स्थिती
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या माजी मंत्री पंकजा मुंडे गटाचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, भाजपचे त्यावेळचे आमदार यांच्या गटाचे १६ संचालक, तर विरोधी गटाचे तीन संचालक निवडून आले होते. त्यानंतरच्या राजकीय घडामोडीत पंकजा मुंडे गटातील दोन संचालक राष्ट्रवादीत गेले होते. त्यामुळे सत्ताधारी गटाचे १४, तर विरोधी गटाचे ५ संचालक आहेत. विद्यमान संचालक मंडळाने त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामगिरीचा कस लागणार आहे.