बीड : जलजीवन मिशनअंतर्गत कृती आराखड्यातील वर्षभरात झालेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ४ मार्च रोजी घेतला. यावेळी या कार्यक्रमाअंतर्गत गावांचे प्रस्ताव शासनास सादर करण्यापूर्वी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या संबंधित यंत्रणेस सूचना दिल्या. तसेच सध्या पाणीपुरवठा योजना बंद असलेल्या गावांचा अथवा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसलेल्या गावांचा समावेश होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी काही गावांमधील सद्यस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे विविध कारणाने यशस्वीरित्या कार्यान्वित होणे शक्य नाहीत, त्या पाणीपुरवठा योजना त्या स्थितीत अंतिम करून पुनरूज्जीवित करण्यासाठी जिल्हा परिषदेस हस्तांतरित करता येतील असे सांगितले. पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील विविध गावांतील कामांचादेखील आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येकाला दरडोई किमान ५५ लिटर पाणीपुरवठा प्रतिदिन करणे हे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. जलजीवन मिशन कार्यक्रम राबविण्याकरिता ५० टक्के निधी राज्य शासन व ५० टक्के निधी केंद्र शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील एकूण १३६७ गावांची योजना पूर्ण करण्याच्या दृष्टीने वर्गवारी करण्यात आली असून १४२ गावात किरकोळ दुरुस्तीद्वारे ९७९५ प्रस्तावित नळजोडणी करावयाची असून उर्वरित ११२४ गावांमध्ये प्रस्तावित कामांद्वारे ३ लाख ४९ हजार ४४९ नळजोडणी करण्यात येईल. या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
040321\1944042_bed_13_04032021_14.jpg
===Caption===
आढावा बैठकीत संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना देताना जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व इतर विभागाचे अधिकारी दिसत आहेत.