शिरूर कासार : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयासमोरील नालीचे काम सुरू असल्यामुळे खोदकाम करताना भारत संचार निगम लिमिटेड कंपनीची ओएफसी तुटली असून अद्यापही जोडणी केली नसल्यामुळे इंटरनेट सेवा बंद असून कार्यालयातून सुरू असणारे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे चौक ते जिजामाता चौकापर्यंत सुरू असलेल्या भूमिगत नालीच्या कामामुळे जेसीबीद्वारे ऑप्टिकल फायबर केबल तुटले आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांतर्गत होणारी कामे खोळंबली आहेत. मागील आठ दिवसांपासून ही समस्या असल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात दुय्यम निबंधक कार्यालयाचे दुय्यम निबंधक ए.आर. जव्हेरी यांनी बी.एस.एन.एल. पाटोदा कार्यालयाचे कर्मचारी शेख आणि शिरूरचे कर्मचारी गणेश गिरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधूनही ओएफसी दुरुस्त करण्यात आली नाही. या संदर्भात दुय्यम निबंधक कार्यालयाचे बीएसएनएलचे कार्यकारी अभियंत्यांना २५ ऑगस्ट रोजी पत्रदेखील दिले आहे.
ओएफसी तुटल्याने खरेदी-विक्रीच्या कामात खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST