धारूर : येथील बसस्थानक मागील काही वर्षांपासून इमारतीच्या प्रतीक्षेत असून सध्या येथे पिण्याच्या पाण्याची तसेच प्रसाधनगृहाची सुविधा नसल्याने शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगार प्रमुखांना धारेवर धरले. स्थानकातील सर्व परिस्थिती दाखवून तात्काळ काम सुरू करून प्रवाशांना सुविधा देण्याची मागणी केली.
धारूर येथे भुईकोट व गडकोट महादुर्ग असलेला किल्ला असून निसर्गरम्य नैसर्गिक साधनसंपत्तीने लाभलेला आहे. त्यामुळे बाहेर गावावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. शिक्षणासाठी खेड्यातून येणाऱ्या मुलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, येथील बस स्थानकाची शौचालयाची दुर्दशा झाली आहे. प्रवाशांना पुरेशा सुविधा उपलब्ध कराव्यात नसता जनतेतून वर्गणी करून काम केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन शिनगारे, भाजपचे नगरसेवक बालाजी चव्हाण, रामेश्वर खामकर, गणेश सावंत, साजीद भाई, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष सादेक इनामदार, ज्येष्ठ पत्रकार अतुल शिनगारे, ईश्वर खामकर, विश्वास शिनगारे, आक्रम भाई, संदीप पुजदेकर आदी उपस्थित होते.
वरिष्ठांना अहवाल पाठवून कार्यवाही करू
आम्ही वरिष्ठांकडे अहवाल पाठवला असून त्यांचे आदेश येईपर्यंत आम्ही तात्पुरत्या स्वरूपात दोन दिवसांच्या आत शौचालय सुरू करणार असून अहवाल मंजूर होऊन आल्यानंतर प्रत्यक्ष शौचालयाचे काम करणार आहोत, असे अगार प्रमुख शंकर स्वामी यांनी सांगितले.