अंबाजोगाई : शहरालगत चनई परिसरातील सह्याद्रीनगर, या ठिकाणी एक महिला व एक पुरुष मिळून दोघे संगनमताने वेश्या व्यवसाय चालवीत असल्याची तक्रार करून योग्य कार्यवाही करण्याची मागणी या परिसरातील रहिवाशांनी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.
अंबाजोगाई शहरालगत चनई परिसरातील सह्याद्री नगर परिसरात एका घरामध्ये एक महिला व एक पुरुष मिळून राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालवीत असल्याने याचा मोठा त्रास या परिसरातील रहिवाशांना होऊ लागला आहे. या परिसरात अनेक घरे असून लहान मुलांसह अनेक कुटुंबीय राहतात. गेल्या काही महिन्यांपासून येथे असणाऱ्या त्या घरासमोर मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच थांबलेली असतात. याचाही मोठा त्रास परिसरातील लोकांना होतो. यासंदर्भात यापूर्वीही शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मात्र, त्याची दखल न घेण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन दिले. आता याप्रकरणी कोणती कारवाई होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.