बीड : सौताडा येथील दऱ्यामध्ये धबधब्याच्या जवळ ८ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास एका वृद्धाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याची ओळख मात्र पटली नव्हती. पोलिसांनी शोध घेतला असता, हा मृतदेह बीड तालुक्यातील करचुंडी येथील वृद्धाचा असल्याचे समोर आले आहे. तर, १९ डिसेंबरपासून ते बेपत्ता होते. याप्रकरणी ‘मिसिंग’ नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल होती.
बाबूराव काशीनाथ मुळीक (वय ५६ रा. करचुंडी, ता. बीड) असे मृताचे नाव आहे. ते वनमजूर म्हणून वन विभागात कार्यरत होते. १९ डिसेंबर रोजी घरातून ते बाहेर गेले होते. मात्र, रात्री परत न आल्यामुळे २० डिसेंबर रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. त्यावेळी खून केल्याचा संशयदेखील घरच्यांनी व्यक्त केला होता. त्यादृष्टीने नेकनूर पोलिसांनी तपासदेखील कोला मात्र, काही निष्पन्न न झाल्याने त्यांचा शोध घेण्याचे काम नेकनूर ठाण्याचे प्रमुख लक्ष्मण केंद्रे व कर्मचारी करत होते.
८ जानेवारी रोजी दुपारी सौताडा येथील जंगलामध्ये वनविभागाचे कर्मचारी भाऊसाहेब पेचे व नवनाथ उबाळे हे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना मुळीक यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, त्यांनी याची माहिती पाटोदा पोलिसांना दिली. मृतदेहाचे पाटोदा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तपास केल्यानंतर मुळीक यांचा मृतदेह असल्याचे समोर आले. याप्रकरणी पाटोदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.
सौताडा येथील मंदिराला दिली देणगी
पाटोदा तालुक्यातील सौताडा येथे खोल दरीमध्ये जंगलात मंदिर व धबधबा आहे. त्या ठिकाणी बाबूराव मुळीक गेले होते. त्यांनी तेथील मंदिरात ५०० रुपयांची देणगीदेखील दिली होती, असे पोलीस तपासात उघड झाले. त्यानंतर मंदिरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.