- संतोष स्वामीदिंद्रुड ( बीड) : खंडोबा यात्रेनिमित्त धारुर तालुक्यातील देवदहिफळ येथे भव्य कुस्तीच्या दंगलीचे आयोजन ग्रामस्थांनी आज केले होते. यात राज्यभरातून कुस्तीपटूंनी हजेरी लावली. मात्र, दोन मल्ल मुलींनी विरोधी मुलांना रोमहर्षक सामन्यात धूळ चारत मिळविलेला विजयच चर्चेत राहिला. या दोन्ही पहेलवान मुलींवर रोख पारितोषिकांचा वर्षाव झाला.
सकाळी अकरा वाजल्यापासून कुस्ती स्पर्धेत सुरुवात करण्यात आली. तीन वर्षां पासून ते पन्नास वर्षांपर्यंतच्या कुस्तीपटूंनी या दंगलीत सहभाग नोंदवला. उद्घाटन महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील नामवंत तालमीचे वस्ताद याप्रसंगी उपस्थित होते.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैष्णवी सोळंके या १६ वर्षीय युवतीने बीड जिल्ह्यातील कांदेवाडी येथील सोहम खाडे या मल्लास तर हिंगोलीच्या रूपाली शिंदे या युवतीने भोगलवाडीच्या गजानन तिडके यास रोमहर्षक सामन्यात धुळ चारली. जवळपास प्रत्येकी पाच मिनिटे चाललेल्या दोन्ही कुस्तीने दंगलीत वेगळीच ऊर्जा भरली. अखेर दोन्ही युवतींनी मोठ्या धैर्याने मुलांना धूळ चारली. विजयानंतर हजारोंची बक्षिसे उपस्थितांनी विजयी युवतींना दिली.
रूपाली शिंदे व वैष्णवी सोळंके या मुलींनी कुस्तीत मिळवलेला विजय साऱ्या यात्रेत चर्चेचा विषय ठरला. यात्रेकरूंनी दोन्ही मल्ल मुलींचे कौतुक करत, छोरियां छोरों से कम नही! अशी थाप त्यांच्या पाठीवर दिली. तर विजयानंतर रूपालीच्या वडिलांनी तिला खांद्यावर घेऊन फडात फिरवले.