बीड : जिल्ह्यात कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. केंद्रावरील गर्दी पाहता पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाय अधिकारी, कर्मचारी, परिचारिकांकडून ही लाभार्थ्यांचे समुपदेशन करून लस दिली जात आहे. बीडमधील चंपावती शाळेतील केंद्रावर आरोग्य पथकही तैनात असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात सध्या सुरूवातीस ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जात होती. नंतर ३० वर्षांवरील व आता १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जात आहे. लाभार्थी संख्या पाहता आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविली आहे. आरोग्य उपकेंद्रामध्ये ही लस देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असे असले तरी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केलेली आहे. तरीही काही लोक ऑफलाईन लस घेण्यासाठी गर्दी करतात. हीच गर्दी टाळण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात केला जात आहे. बीड शहरातील चंपावती शाळेतील केंद्रावर शनिवारी गर्दी पाहून बंदोबस्त लावला होता.
दरम्यान, आलेल्या नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. ते दूर करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, परिचारिका या नागरिकांचे समुपदेशन करत असल्याचे दिसले. विशेष म्हणजे शनिवारी दुपारी तर परिचारिकांनी अवघ्या अर्धा तासात जेवण करून पुन्हा कर्तव्यावर रूजू झाल्याचे दिसले. त्यांची धडपड पाहून सर्वांनीच समाधान व्यक्त केले.
....
एकाच दिवसात २६ हजार डोस
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात तब्बल २६ हजार २१४ लोकांना लस देण्यात आली. यात २२ हजार ३६९ लोकांनी पहिला डोस घेतला तर ३ हजार ८४५ लोकांनी दुसरा डोस घेतला. अनेक महिन्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे.
...
ही टीम घेतेय परिश्रम
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, डॉ. बाबासाहेब ढाकणे, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. औदुंबर नालपे, डॉ. स्मिता शिंदे, डॉ. गजानन सारंगकर, इन्चार्ज आर.एन.सय्यद, सुरेखा लोमकसकर, सविता सरकटे, सुजाता जाधव, प्रियंका कागदे, शुभम माने, रमीज सय्यद, हिरा घरत, शांता सानप, सुमय्या शेख, घोडके, अलका माने, अभिजित तोगे, रमेश तांदळे, विकास शिंदे, अमित मोटेगावकर, प्रिया घोडके, आत्माराम कदम, सुस्कर ही टीम बीडमध्ये लसीकरण करत आहे.
---
लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गर्दी होऊ नये, यासाठी ऑनलाईन नोंदणी पद्धत आहे. तरीही लोक येत असल्याने पोलीस बंदोबस्त मागविलेला आहे. सर्व टीम नियोजनबद्ध काम करीत आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे.
-डॉ. बाबासाहेब ढाकणे, नोडल ऑफिसर, बीड.
===Photopath===
260621\26_2_bed_10_26062021_14.jpeg
===Caption===
डॉ.बाबासाहेब ढाकणे