बीड : कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बीड जिल्ह्यात जिल्ह्यातील यंत्रणा सर्व स्तरावर काम करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोना नियंत्रणात येत असला तरी जिल्ह्यात ग्रामीण भागात संसर्ग प्रमाण पुन्हा वाढताना दिसून येत आहेत. प्रशासन कठोर होत असून, नागरिकांनीही कोरोनाची साखळी तोडण्यासह डेल्टा प्लसबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. डेल्टा प्लसचा विषाणू आलेला व गेलेला लक्षात येत नाही. त्यासाठी कोविड-१९ च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक असलेल्या त्रिसूत्रीचे पालन करणेच गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चे २२ रुग्ण देशात सापडले असून, यात सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आता कुठे नियंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना आता पुन्हा डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा अधिक प्रभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट जाहीर करून हाय अलर्ट दिला आहे. बीड जिल्ह्यातही संवेदनशीलतेने आरोग्य यंत्रणा काम करीत आहे.
काय खबरदारी घेतली जात आहे..
जिनॉम सिक्वेन्सिंग अंतर्गत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या कोरोनाबाधितांचे अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतून डेल्टा प्लस व्हरिएंटच्या संदर्भाने सहजगत्या शंभर नमुने दर तीन महिन्याला घेतले जातात. डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोविडच्या तिसऱ्या स्तरानुसार निर्बंध जिल्ह्यात लावलेले आहेत. गर्दी कमी करणे आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी करणे, व्यापक प्रमाणावर चाचण्या करणे, ट्रेसिंग वाढवणे तसेच जास्तीत जास्त लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यावर जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने भर दिला आहे.
-------
मास्क, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सच प्रभावी
कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले असले तरी डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रभाव जास्त आहे. तसेच डेल्टा प्लस अँटिबॉडीजची परिणामकारकता कमी करते. या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर तुलनेने जास्त व घातक आहे. त्यामुळे मास्कचा नियमित वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. - डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
---------
जिल्ह्यात रोज तीन ते चार हजार टेस्टिंग
जिल्ह्यात दररोज तीन ते चार हजार संशयितांची कोरोना चाचणी केली जात आहे. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी होते, तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त होती. मात्र, मागील पाच-सहा दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आढळून येत आहे. अलीकडच्या दोन दिवसांत ग्रामीण भागात रुग्णवाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
-------------
कोरोनाचे एकूण रुग्ण - ९१४२३ बरे झालेले रुग्ण - ८७६९०
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १२५५
कोरोना बळी - २४७८
----------