बीड : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील सरकारी दवाखान्यात उभी केलेली कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी ज्ञानेश्वर आसाराम धुरवडे यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेलगावच्या बाजारातून दोन मोबाईल चोरले
बीड : धारुर तालुक्यातील तेलगाव येथील बाजारातून चोरट्यांनी ३६ हजार ५०० रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना २१ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. धारुर तालुक्यातील चाटगाव येथील अर्जुन बाबासाहेब केकान हे तेलगाव येथील हनुमान मंदिरासमोर भाजीपाला खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने १५ हजार ५०० व २१ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी दिंद्रुड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकी लावण्यासाठी गेलेल्या महिलेला चाबकाने मारहाण
बीड : शेतात सरकी लावण्यास गेलेल्या महिलेस चौघांनी औतावरच्या चाबकाने मारहाण केल्याची घटना २२ जून रोजी सायंकाळी वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथे घडली. रुक्मिणी व्यंकटी भोजणे या त्यांच्या शेतात सरकी लावण्यासाठी गेल्या असता शेती आमची आहे, वहिती करू नका म्हणत बाबासाहेब भोजणे, दत्ता बाबासाहेब भोजणे, शर्मिला बाबासाहेब भोजणे, सरस्वती बाबासाहेब भोजणे यांनी गालात चापट मारून औतावरच्या कोरड चाबकाने मारहाण करून धमकी दिली. रुक्मिणी भोजने यांच्या फिर्यादीवरून वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.