केज (जि. बीड) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा यंत्रणेने खोलवर जाऊन तपास करावा व सर्व आरोपींसह, या घटनेमागील मुख्य सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली. मस्साजोग येथे देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, शासनाने तपासासाठी एसआयटी नेमून, न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. सर्व आरोपींना अटक करून, मुख्य सूत्रधारालाही अटक झाली पाहिजे. त्याच्या मोबाइलचे सीडीआर काढून तपास केला, तर या वस्तुस्थिती समोर येईल.
मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
सरपंच देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन यापुढे ही मुले बारामती येथील विद्यानिकेतन येथे त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेतील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
'सोमनाथच्या मृत्यूची स्थिती सरकारपर्यंत पोहोचवू'
परभणीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात भेट देऊन पाहणी केली. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सूर्यवंशी यांना मारहाण करणे योग्य नव्हतेन त्यांच्या मृत्यू प्रकरणाची वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आमची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सोमनाथच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे विचारले असता, 'सत्ताधाऱ्यांनी भेटी देणे चांगले असले तरीही केवळ भेटी न देता दोषींवर कडक कारवाई करून चांगला संदेश द्यावा,' असे म्हणत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर टोला लगावला.
तपासात त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घेऊ; अजित पवार यांचे मस्साजोगमध्ये आश्वासन
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणे ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या गुन्ह्यातून कोणाचीही सुटका होऊ नये यासाठीच सरकारने एसआयटी व न्यायालयीन अशी दोन प्रकारे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासात कुठलीही त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी राज्य सरकार घेत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शनिवारी सायंकाळी मस्साजोग येथे ते बोलत होते. येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची पवार यांनी शनिवारी सायंकाळी भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी गावकरी व माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, "सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन अशा दोन्हीही चौकशा केल्या जातील, अशी सभागृहात घोषणा केली आहे. या तपासात कुठलीही त्रुटी किंवा उणीव राहणार नाही, याची राज्य सरकार खबरदारी घेणार आहे. या गुन्ह्यातून कोणीही सुटणार नाही," असे आश्वासनही पवार यांनी गावकऱ्यांना दिले. दरम्यान, अजित पवार यांचा धावता दौरा तसेच चार आरोपी मोकाटच असल्यामुळे गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. दोन दिवसांत आरोपीस अटक करा, अशी मागणीही गावकऱ्यांनी यावेळी केली