लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मतदारांत जर मतदानाविषयी प्रभावीपणे जनजागृती केली, तर निश्चितच मतदानाचा टक्का वाढतो, हे २०१९ च्या बीड लोकसभा निवडणुकीत अनुभवले होते; परंतु त्यानंतर ही जनजागृती मोहीम दिसली नाही आणि बीड जिल्ह्याचा मतदानाचा टक्का २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १४ टक्क्यांनी घसरला. २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत फक्त एक टक्क्याने वाढ झाली होती.
बीड जिल्ह्यात १२३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. १८ बिनविरोध निघाल्या. १११ ग्रामपंचायतींसाठी १,५९,७२९ पैकी १,३३,४९८ मतदान झाले. ही टक्केवारी ८३.५८ टक्के आहे. ८२ टक्के महिलांनी, तर ८५ टक्के पुरुषांनी मतदान केले होते. इथेदेखील पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची मतदान टक्केवारी तीन टक्के कमी आहे. स्थानिक विषय घेऊन ग्रामपंचायतची निवडणूक लढविली जात असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढतच असतो.
लोकसभेसाठी ८३ टक्के
बीड लोकसभेसाठी २०१४ मध्ये ६९ टक्के, तर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत विक्रमी ८४ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये निवडणूक आयोगातर्फे मोठ्या प्रमाणावर जनजागृती मतदारांमध्ये केली होती. त्यामुळे मतदानही विक्रमी वाढले.
विधानसभेसाठी ६८ टक्के
बीड लोकसभेसाठी विक्रमी ८३ टक्के झाले. त्यानंतर सहा महिन्यांतच झालेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६८ टक्क्यांपर्यंत मतदान घसरले. २०१४ मध्ये ७१ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये तीन टक्क्यांनी मतदान घटले होते.
१११ ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के मतदान
बीड जिल्ह्यात १११ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी ८४ टक्के मतदान झाले होते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढत असते; परंतु २०१९ च्या लोकसभेच्या तुलनेत फक्त एक टक्क्याने मतदान वाढले होते.