लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता यापुढे बसेसला सॅनिटाईज करण्याऐवजी एकदाच अँटिमायक्रोबियल कोटिंग केले जाणार आहे. यासाठी बीड विभागातील ३२४ बसेस प्रायोगिक तत्त्वावर निवडल्या आहेत. या कोटिंगची दोन महिन्यांपर्यंत मुदत असणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आता पुन्हा लॉकडाऊन करणे परवडणारे नसल्याने शासन नवनवीन उपाययोजना करत आहे. राज्यात सर्वत्र निर्बंध लावले जात असले तरी लालपरी धावण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु बस धावण्यापूर्वी अथवा प्रवासाहून आल्यावर सॅनिटाईज करण्याचे आदेश होते. त्याप्रमाणे केलीही जात होती. परंतु आता ही पद्धत बंद होणार आहे. राज्यातील सर्वच विभाग नियंत्रकांना मध्यवर्ती कार्यालयाने पत्र पाठवून बस सॅनिटाईज न करता कोटिंग करण्याच्या सूचना केल्या आहेत. पंधरवड्यात बसेस कोटिंग होऊन प्रवाशांच्या सेवेत धावणार असल्याचे सांगण्यात आले. यापासून कोरोना खरोखरच रोखला जाऊ शकतो का? हे तपासणीनंतरच समजणार आहे.
...
पैसे देण्यापूर्वी होणार तपासणी
कोटिंग करण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आलेले आहे. कोटिंग झाल्यावर ६० टक्के आणि उर्वरित ४० टक्के निधी हा दोन महिन्यांनी तपासणी केल्यावर देणार आहेत. या कोटिंगची मुदत दोन महिने आहे. याचवेळी ठराविक बसेसमध्ये प्रवास करून प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. हा सर्व खर्च बीड रापमच्या निधीतून केला जाणार आहे.
---
यापुढे बसेस सॅनिटाईज करण्याऐवजी कोटिंग केल्या जाणार आहेत. याची मुदत दोन महिने असून, ६० टक्के खर्च अगोदर, तर ४० टक्के तपासणीनंतर दिले जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या ३२४ बसेसला कोटिंग करण्याचे नियोजन आहे.
अजय मोरे, विभाग नियंत्रक, रापम, बीड.
---
जिल्ह्यातील एकूण बसेस ५४०
कोटिंग केल्या जाणाऱ्या बसेस ३२४.