पुरुषोत्तम करवा
माजलगाव : शासनाकडून कोरोनाकाळात सर्वसामान्य जनतेसाठी मोफत धान्य वाटपासाठी मे महिन्यात रेशन दुकानदारांना वितरित करण्यात आले होते. हे धान्य अनेक दुकानदारांनी वाटप न करताच वाटपाचे अंगठे घेण्यात आले; मात्र सव्वा महिना उलटला तरी त्याचे रेशन वाटपच न करता या धान्याची वाट काळ्याबाजारात लावण्यात आल्याची चर्चा होत आहे. धान्यवाटप न केल्याने कार्डधारकांतून ओरड होत असताना महसूल प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.
मागील काही महिन्यात लॉकडाऊन सुरू असल्याने केंद्र व राज्य शासनाने गोरगरिबांना आपली उपजीविका भागविता यावी म्हणून मे व जून महिन्यात मोफत गहू, तांदूळ दिले होते. प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेत ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रतिव्यक्तीप्रमाणे व अंत्योदय योजनेत याचप्रमाणे वाटपाचे आदेश होते. त्यासाठी शासनाने मेच्या पहिल्याच आठवड्यात १७८ रेशन दुकानदारांना वितरित केले. अंत्योदय योजनेच्या ३ हजार ४१२ कार्डधारकांना तर अन्नसुरक्षा योजनेच्या ४० हजार ४५५ व शेतकरी योजनेत १४ हजार ९३३ कार्डधारकांना हे धान्य मोफत वाटप करायचे होते.
असे असताना बऱ्याच रेशन दुकानदारांनी मे महिन्यात कार्डधारकांचे मशीनवर अंगठे घेऊन पावत्या दिल्या; मात्र आज देऊ उद्या देऊ म्हणून हे धान्य आजपर्यंत वाटपच केले नाही. आता ओरड होत असताना चालू जून महिन्याचे मोफतचे धान्य आता कार्डधारकांना वाटून मोकळे व्हायचे व मे महिन्याचे धान्य काळ्याबाजारात पाठवायचे असा दुकानदारांचा डाव उघड होत आहे.
शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना दोन महिने मोफतचे धान्य आलेले असताना पुरवठा अधिकाऱ्यांशी हाताशी धरून काही ठरावीक लोक मे महिन्याचे धान्य काळाबाजारात घालण्याच्या तयारीत असताना महसूल प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.
धान्य देण्याअगोदर पावती
माजलगाव तहसील अंतर्गत असलेल्या १७८ दुकानदारांपैकी अनेक दुकानदारांनी कार्ड धारकांकडून मशीनला अंगठे लावून त्यांना केवळ हातात पावत्या दिल्या व पुढील महिन्यात आपणास धान्य मिळेल असे म्हणून त्यांना पाठवून दिले.
ज्या कार्डधारकांना रेशन दुकानदाराने पावत्या दिल्या, त्यापैकी अनेकांच्या पावत्या हरवल्या आहे. यामुळे या कार्डधारकांना रेशन मिळेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कार्डधारकांनी धान्य घेतल्यानंतरच मशीनवर अंगठा लावावा. असा काही प्रकार घडला असेल तर कार्डधारकांनी तक्रार द्यावी, त्या दुकानदाराची चौकशी करण्यात येईल.
- एस टी कुंभार, पुरवठा अधिकारी.