दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा सर्रास वापर
बीड : शहरातील मुख्य बाजारपेठेसह भाजीमंडईत सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. मात्र, बीड नगरपालिकेचे पथक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. लॉकडाऊन लागल्यापासून शहरात एकही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्रासपणे दुकानांवर प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर केला जात आहे.
डासांचे प्रमाण वाढले
माजलगाव : शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील अनेक भागांत स्वच्छता होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक दुकानदारास डासांच्या प्रादुर्भावाचा त्रास होत आहे. परिसरात डास प्रतिबंधक फवारणीची मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे.
बँकेत ग्राहकांची गर्दी
परळी : येथील एसबीआय बँकेच्या शाखेत ग्राहकांची गर्दी वाढली असून, कोरोना पार्श्वभूमीवर कसलीही काळजी घेतली जात नसल्याची तक्रार मनसेचे परळी तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी मंगळवारी केली आहे. याबाबत बँक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
रुग्णालयात गर्दी
अंबाजोगाई : हवामानातील बदलाने अंबाजोगाई शहर व परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. या साथीमुळे लहान बालके, ज्येष्ठ नागरिकांना या साथीचा मोठा त्रास होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे.
उत्कृष्ट खेळाबद्दल सत्कार
बीड : ९ ते २५ जानेवारीदरम्यान चिली देशातील सँटियागो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर गट महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्रातील अक्षता ढेकळे , वैष्णवी पालखे, ऋतुजा पिसाळ यांनी चांगली कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचा बीडचे जिल्हा क्रीडाधिकारी अरविंद विद्यागर, बीड जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. दिनकर थोरात यांनी सत्कार केला.
स्वच्छतागृहाची दुरवस्था
नेकनूर : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून, यामुळे स्वच्छता करण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. मात्र, आगाराचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
वन्यप्राण्यांचा त्रास
अंबाजोगाई : यावर्षीचा रबी हंगाम जोरदार सुरू आहे. परतीचा मोठा झालेला पाऊस यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, करडई यांचा पेरा तर उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. उगवण चांगली झाल्याने या पिकांचा हरिण व रानडुकरे फडशा पाडत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.