बीड : भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता कुख्यात आरोपी सतीश ऊर्फ खोक्या भोसले याचे पैशांचे बंडल फेकण्यासह इतर व्हिडीओ व्हायरल झाले. त्याचा सातबारा कोरा असतानाही गळ्यात सोने आणि हातात पैशांचे बंडल आले कोठून?, त्याचा नेमका धंदा काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोक्याने २०० हरिण मारल्याचा आणि सावकारकीचा आरोप आहे.
वाल्मीक कराड निकटवर्तीय असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आ. सुरेश धस यांच्यासह अनेकांनी टीका केली. परंतु, चार दिवसांपूर्वी आ. धस यांचाच कार्यकर्ता असलेल्या खोक्या भोसले याने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पैसे फेकणे, मुलांना धमकी देणे, असे व्हिडीओ व्हायरल झाले होते. वन विभागाने शनिवारी त्याच्या घराची झडती घेतली असता, वाळलेले मांस आणि शिकारीचे साहित्य आढळले होते. त्याच्यावर शिरूर पोलिसात दोन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
फसवणूक, गुंडगिरी, सावकारी व पक्षविरोधी काम खोक्या करत होता. त्यामुळेच २०२१ साली भाजप भटके-विमुक्त आघाडी, बीड जिल्हाध्यक्ष या जबाबदारीने त्याची पक्षातून हकालपट्टी व निलंबन झाले होते, अशी माहिती डॉ. लक्ष्मण जाधव यांनी शनिवारी दिली. तरीही तो आपलाच कार्यकर्ता आहे, असे आ. धस यांनी माध्यमांना सांगितले होते.