बीड/केज - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी आलेल्यांना अडवले होते. याचाच राग धरून देशमुख यांची हत्या झाली होती. आता याच कंपनीच्या विरोधात केजमधील भोसले, तेलंग कुटुंबीय केजमध्ये तहसीलसमोर गुरुवारपासून उपोषणास बसले आहेत. इकडे मुलाचे उपोषण सुरू असतानाच घरी आईचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी मृतदेह केज तहसीलसमोर आणून पाच तास ठेवला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
सुबाबाई गोपाळ भोसले (वय ७०, रा. भोसले वस्ती, केज) असे मयत महिलेचे नाव आहे. संतराम भोसले, मारुती भोसले, पांडुरंग भोसले, सूर्यकांत तेलंग, बलभीम तेलंग आदी लोक २४ जुलैपासून केज तहसीलसमोर उपोषणास बसले आहेत. या लोकांच्या केजमधील सर्व्हे नं. ७६ येथे जमिनी आहेत. तेथेच त्यांची पत्र्याची घरे आहेत. आवादा कंपनीने पूर्वीच्या सर्व्हेप्रमाणे विद्युत पोल न बसवता केजमधील गावगुंडांना हाताशी धरून शेतामध्ये जबरदस्तीने पोल रोवले जात आहेत. तसेच तीन लोकांनी दमदाटी करून धमकीही दिली होती. त्यामुळे कंपनीने आमच्या शेतात पोल बसविणे थांबवावे, या मागणीसाठी ही दोन्ही कुटुंबे उपोषणाला बसली होती. इकडे मुलासह इतर लोक आंदोलन करत असतानाच सुबाबाई यांची प्रकृती खालावली. त्यांना केजमधीलच खासगी रुग्णालयात नेले, परंतु तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले. त्यानंतर मुलगा संतराम यांच्यासह संतापलेल्या इतर आंदोलकांनी तातडीने घरी धाव घेत मृतदेह रुग्णवाहिकेतून केज तहसीलसमोर आणला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
बुधवारी बोलावली बैठकपाच तास मृतदेह तहसीलसमोर ठेवल्यानंतर प्रशासनाची धावपळ झाली. उपविभागीय अधिकारी आणि आवादा कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत बुधवारी संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह घरी नेण्यात आला. तसेच आवादा कंपनीनेही हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत त्या भागात काम करणार नाही, असे लेखी दिले आहे.
तणावाने महिलेचा मृत्यूआवादा कंपनीकडून आम्हाला त्रास दिला जात होता. यामुळे आमचे सर्व कुटुंब दहशतीखाली होते. याच तणावाने सुबाबाई भोसले यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी त्यांचा मृतदेह आंदोलनस्थळी आणला होता.