बीड : तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील एका गावातील एका १७ वर्षीय मुलीवर चार युवकांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, या अत्याचाराने बीड जिल्हा हादरला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपींनी ओळखीचा गैरफायदा घेत पीडितेवर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. या आरोपींमध्ये करण साळवे, वैभव यादव, लखन कांबळे (सर्व रा. पिंपळनेर) आणि दशरथ ढगे (रा. माजलगाव, सध्या पिंपळनेर) यांचा समावेश आहे. पीडितेला धमकावून गप्प ठेवले जात होते. फेब्रुवारी २०२५ पासून मासिक पाळी बंद झाल्याने पीडितेने चाचणी केली असता, तिला गर्भधारणा झाल्याचे समोर आले.
बीडमधील एका खाजगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर गर्भाला पाच महिने झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपींच्या नातेवाइकांनी गर्भपातासाठी दबाव आणल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक अतुलकुमार लांडगे करीत आहेत.