बीड : घरगुती कारणावरून जावयाचे पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी अपहरण करून बेदम मारहाण केली. यात त्यांचा हात-पाय फॅक्चर झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पत्नीसह सासरच्या चौघांविरुद्ध बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामहरी अशोक मोरे (वय ३०, रा. दिमाखवाडी, ता. गेवराई) असे जखमी जावयाचे नाव आहे. रामहरी यांचा विवाह मागच्या वर्षी मे महिन्यात त्यांचा मित्र पारस काकडे याची बहीण अनुसया काकडे हिच्यासोबत झाला होता. सुरुवातीपासूनच त्यांच्यात भांडणे होत असत. त्यामुळे दीड महिन्यांपासून दोघे वेगळे राहत होते. ४ जूनला रामहरी मोरे आपले सामान घेण्यासाठी पत्नीच्या खोलीवर गेले. त्यावेळी दोघांत पुन्हा वाद झाला.
त्यानंतर रामहरी मोरे गावी गेले. उमरद फाट्याजवळ त्यांची दुचाकी बंद पडली, तेवढ्यात त्यांचा मेव्हणा पारस काकडे वाहन घेऊन तिथे आला अन् मोरे यांना शिवीगाळ करू लागला. मोरे यांनी शेतात पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाठलाग करून पकडले. सुरुवातीला शिवीगाळ, नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण, आणि त्यानंतर दगडाने दोन्ही पायांवर वार केले. याप्रकरणी पत्नी अनुसया काकडे-मोरे, मेहुणा पारस गोरखनाथ काकडे, सासू कुशीवर्ता गोरख काकडे (सर्व रा. पोखरी, ता. गेवराई), शारदा नरवडे (रा.बळेगाव, ता.अंबड, जि. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.