अंबाजोगाई : शहरालगत मोरेवाडी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. विजयमाला नानाभाऊ सरवदे (वय ५७), रा. केज) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून मागील ३५ वर्षापासून त्या कार्यरत होत्या.
घटनेची माहिती अशी की, विजयमाला सरवदे नोकरीच्या निमित्ताने दररोज केजहून अंबाजोगाईला ये-जा करत असत. आज सकाळी देखील त्या अंबाजोगाईला येण्यासाठी धारूरहून परळीच्या दिशेने निघालेल्या बसमध्ये (एमएच 14 एमएच 2347) बसल्या. या बसने अंबाजोगाई येथे थांबा घेतल्यावर विजयमाला सरवदे या उतरू लागल्या. त्यावेळी त्यांच्या साडीचा पदर बसमध्य अडकला आणि त्या खाली कोसळल्या. इतक्यात बस पुढे निघाली आणि त्यांच्या दोन्ही पायांवरून चाक गेले.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयात शोककळा पसरली असून सहकारी कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.
चालकावर गंभीर आरोप दरम्यान, अपघातावेळी बस चालक नशेत होता, त्याच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या अपघातासाठी जबाबदार असलेल्या बस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.